खजिन्यासह बुडालेले जहाज सापडले!
By admin | Published: December 6, 2015 03:23 AM2015-12-06T03:23:36+5:302015-12-06T08:15:58+5:30
कार्टाजिना किनाऱ्याजवळ १७०८ मध्ये बुडालेले स्पेनचे जहाज ‘सॅन जोस’चे अवशेष सापडल्याची घोषणा कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष हुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी शनिवारी येथे केली.
बोगोटो : कार्टाजिना किनाऱ्याजवळ १७०८ मध्ये बुडालेले स्पेनचे जहाज ‘सॅन जोस’चे अवशेष सापडल्याची घोषणा कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष हुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी शनिवारी येथे केली. हे जहाज स्पेनच्या लढाईत इंग्रजांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असलेले राजे फिलीप पंचम यांच्या जहाज ताफ्यातील होते व त्यावर मौल्यवान रत्ने, सोन्याचांदीची नाणी आणि आभूषणांचा खजिना लादलेला होता, अशी दंतकथा या जहाजाबाबत आहे. त्यामुळे या जहाजाबाबत अनेक वर्षांपासून कुतूहलमिश्रित उत्सुकता आहे.
या जहाजाचे अवशेष सापडल्याची माहिती राष्ट्राध्यक्षांनी टष्ट्वीट करून दिली. या शोधाबाबतची अधिक माहिती नंतर पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे. यापूर्वी सी सर्च अर्माडा (एसएसए) या अमेरिकन कंपनीने १९८१ मध्ये सॅन जोस जहाज बुडालेले ठिकाण आपण शोधले असल्याची घोषणा केली होती. तेव्हा कोलंबिया सरकार एसएसएसोबत काम करत होते. मात्र, नंतर कोलंबिया सरकारने शोधादरम्यान मिळालेल्या खजिन्यावर केवळ कोलंबियाचाचअधिकार असेल, असे म्हटल्यामुळे कंपनी व सरकारमध्ये वाद निर्माण होऊन प्रकरण न्यायालयात गेले होते. पुढे २०११ मध्ये अमेरिकी सरकारने कोलंबिया सरकारचा दावा मान्य केला होता. त्यानंतर कोलंबिया सरकारने हा खजिना मिळविण्यासाठी पुन्हा शोधमोहीम सुरू केली होती.
ब्रिटिश फौजांशी युद्ध सुरू झाल्यानंतर स्पेनच्या राजाने आपला खजिना जहाजाद्वारे सुरक्षित ठिकाणी रवाना केला होता. मात्र, इंग्लिश कमांडर चार्ल्स वेगर यांनी हे जहाज शोधून काढले. या जहाजासाठी झालेल्या लढाईदरम्यान जहाजाचा स्फोट झाला व ते समुद्रात बुडाले. स्फोटामुळे जहाजातील सर्व कर्मचारी मारले गेले होते. या जहाजावर ४ ते १६ अब्ज डॉलर मूल्याचा खजिना असल्याची चर्चा आहे. (वृत्तसंस्था)