63 वर्षांनंतर Crush ला केलं प्रपोज! हायस्कूलमध्ये पडले होते प्रेमात, आता करणार लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 09:05 AM2023-07-07T09:05:26+5:302023-07-07T10:07:31+5:30
ही कहाणी आहे अमेरिकेत राहणाऱ्या 78 वर्षांच्या थॉमस मॅकमीकिन आणि नॅन्सी गॅम्बेल यांची.
एका वृद्ध जोडप्याची प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तब्बल 63 वर्षांनंतर दोघे पुन्हा भेटले आहेत. हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांची पहिली भेट झाली. अभ्यासादरम्यान ते प्रेमात पडले. मात्र वैयक्तिक कारणांमुळे हे जोडपे वेगळे झाले. आता इतक्या वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले असून लग्न करणार आहेत. दरम्यान, ही कहाणी आहे अमेरिकेत राहणाऱ्या 78 वर्षांच्या थॉमस मॅकमीकिन आणि नॅन्सी गॅम्बेल यांची.
दोघेही 60 च्या दशकात एकमेकांना भेटले होते. नॅन्सी यांना पाहून थॉमस त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ते हायस्कूलमध्ये शिकत होते. कालांतराने ते दोघं एकत्र आले. मात्र शाळा संपल्यानंतर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यामुळे ते एकमेकांपासून लांब झाले. पण, कधी कधी दोघे एकत्र फिरायला किंवा पार्टी करायला जात होते. मात्र, लग्नानंतर त्यांनी एकमेकांना भेटणे बंद केले. नॅन्सी आणि थॉमस यांनी वेगवेगळे लग्न केले.
वर्षानुवर्षे त्यांच्यात संपर्क नव्हता. पण 2012 मध्ये 50 व्या हायस्कूलच्या रियुनियनमध्ये ते पुन्हा भेटले. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले, पण अंतर राहिले. अखेर 2022 च्या शेवटी नशिबाने वळण घेतले आणि हे जोडपे पुन्हा एकत्र आले. दरम्यान, नॅन्सी यांच्या पतीचे निधन झाले आहे. तसेच, थॉमस यांचीही पत्नी नाही आहे. अशा परिस्थितीत या जोडप्याने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघांच्या घरच्यांनीही होकार दिला.
गेल्या आठवड्यात जेव्हा नॅन्सी या टँपा विमानतळावर पोहोचली तेव्हा थॉमस यांनी तिला प्रपोज केले. यावेळी दोघांचे नातेवाईक उपस्थित होते. आता हे जोडपे लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहेत. त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. थॉमस यांनी 'फॉक्स 13' ला सांगितले की, ते गेल्या सोमवारी खरेदीसाठी गेले होते आणि आता कॅलिफोर्नियामध्ये लग्न करण्याचा विचार करत आहे.
"नॅन्सी माझी क्रश होती. ती एक सुंदर आणि दयाळू मनाची स्त्री आहे. आम्ही कॉलेजमध्ये डेट केले, पण नंतर ब्रेकअप झाले. मात्र सुदैवाने आम्ही पुन्हा भेटलो. मला माझे उर्वरित आयुष्य नॅन्सीसोबत घालवायचे आहे", असे थॉमस म्हणाले. तर नॅन्सी म्हणाल्या की, "आम्ही बोलणे, ईमेल करणे आणि मजकूर पाठवणे सुरू केले आहे. आम्हाला दीर्घ आयुष्याचा अनुभव आहे."