भाग्यवान दाम्पत्य; मृत्यूही त्यांची फारकत करू शकला नाही!
By admin | Published: August 11, 2016 01:15 AM2016-08-11T01:15:22+5:302016-08-11T01:15:22+5:30
तब्बल ६३ वर्षांच्या वैवाहिक जीवनात सावलीप्रमाणे परस्परांच्या सोबत राहिलेल्या एका अमेरिकी दाम्पत्याची मृत्यूही फारकत करू शकला नाही!
शिकागो : तब्बल ६३ वर्षांच्या वैवाहिक जीवनात सावलीप्रमाणे परस्परांच्या सोबत राहिलेल्या एका अमेरिकी दाम्पत्याची मृत्यूही फारकत करू शकला नाही! वयाची ८५ वर्षे पार केलेल्या या दाम्पत्यामधील पती आणि पत्नी या दोघांनीही काही दिवसांपूर्वी एकाच खोलीत काही मिनिटांच्या अंतराने या जगाचा अत्यंत शांतपणे निरोप घेतला.
हेन्री डे लँगे व जेनेट अशी या जोडप्याची नावे. हेन्री हे कोरियात युद्ध लढलेले अमेरिकी लष्करातील माजी सैनिक तर जेनेट संगीतकार. या दोघांचे सन १९५३ मध्ये लग्न झाले. अमेरिकेच्या डाकोटा राज्यातील प्लेट येथे ते पाच मुले व नातवंडांसह राहायचे.
८७ वर्षांच्या जेनेट अल्झायमरच्या रुग्ण होत्या व सेवा-सुश्रुषेसाठी सन २०११ पासून त्यांना दक्षिण डाकोटामधील एका सुश्रुषागृहात ठेवण्यात आले होते. तिचे पती हेन्री कधी दिवसातून एकदा, कधी दोनदा व तर कधी तिनदाही तिला भेटायला जायचे. पण ८६ वर्षांच्या हेन्री यांचा पौरुषग्रंथीचा कर्करोग बळावल्यानंतर त्यांनाही त्याच सुश्रुषागृहात ठेवण्यात आले व हेन्री आणि जेनेट तेथे एकाच खोलीत असायचे.
गेल्या रविवारी सुश्रुषागृहातील त्याच खोलीत सा. ५.१० वाजता आधी जेनेट यांचे व त्यानंतर अवघ्या २० मिनिटांनी हेन्री यांचे निधन झाले, असे त्यांचा एक मुलगा ली डे लँगे याने सांगितले.
त्या दिवशी सर्व कुटुंबिय सुश्रुषागृहाच्या त्या खोलीत एकत्र जमले होते. रविवार असल्याने सर्वांनी बायबलचे एकत्र पठण सुरु केले. ते पसालम १०३ हे प्रकरण वाचत होते. हे वाचन सुरु असतानाच हातात बायबल घेतलेल्या अवस्थेत जेनटचे अत्यंत शांतपणे प्राणोत्क्रमण झाले.
ली डे लँगे यांनी सीएनएनशी संलग्न केएसएफवाय या स्थानिक वृत्तवाहिनीस सांगितले की, आई गेल्याचे लक्षात आल्यावर माझ्या धाकट्या भावाने उठून बाजूला खुर्चीत बसलेल्या वडिलांना आई स्वर्गवासी झाल्याचे सांगितले. आता तुम्हाला तिच्याशी भांडण्यासाठी स्वर्गातच जावे लागेल,असेही तो वडिलांना थट्टेने म्हणाला.
हेन्रीने जणू नेमके तेच केले. त्यांनी जेनेटला एकदा डोळेभरून पाहून घेतले आणि तिच्यानंतर बरोबर २० व्या मिनिटाला ते स्वत:ही स्वर्गाच्या वाटेवर रवाना झाले.
ली यांनी त्यावेळी घडलेला आणखीही एक विचित्र योगायोग सांगितला. त्यांच्या सांगण्यानुसार हेन्री गेले तेव्हा त्याने खोलीतील भिंतीवरील घड्याळ पाहिले आणि आश्चर्य म्हणजे घड्याळयाचे काटे त्याच क्षणाला थबकले होते.
बॅटरीवर चालणारे ते घडयाळ
हेन्री यांच्या मृत्यूसमयीच नेमके
का थांबावे, याचे कोडे कुटुंबियांना उलगडले नाही. कदाचित
मृत्यूसाठी तीच योग्य वेळ असल्याचा तो परमेश्वरी संकेत असावा,
अशी त्यांची भावना झाली.