‘लुना’ वेगे वेगे गेले, पण उतरताना चंद्रावर काेसळले, रशियाची माेहीम अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 06:18 AM2023-08-21T06:18:24+5:302023-08-21T06:18:56+5:30
आता भारताच्या चंद्रयानाकडे जगाचे लक्ष
माॅस्काे/नवी दिल्ली: ससा आणि कासवाच्या शर्यतीची गाेष्ट तुम्ही लहानपणापासून ऐकली असेल. त्यात वेगाने धावणारा ससा हरताे. असाच प्रकार रशियाच्या चंद्रयान माेहिमेबाबत घडला. भारताचे ‘चंद्रयान-३’ चंद्राकडे झेपावल्यानंतर रशियाने त्यांचे ‘लुना-२५’ हे अतिशय शक्तिशाली राॅकेटच्या माध्यमातून रवाना केले. भारताच्या चंद्रयानाच्या ३ दिवस आधीच ते चंद्रावर उतरणार हाेते. मात्र, त्यापूर्वीच ते चंद्रावर काेसळले आणि रशियाची माेहीम अपयशी ठरली.
रशियाची अंतराळ संस्था ‘राेसकाॅसमाॅस’ने हे जाहीर केले. आता भारताचे लॅंडर ‘विक्रम’ हे २३ ऑगस्टला सायंकाळी चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे. कासवाप्रमाणे भारताचे चंद्रयान हळूहळू कक्षा बदलत चंद्राच्या अतिशय जवळ पाेहाेचले असून ही शर्यत ते जिंकणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
काय घडले?
१८ x १०० किलाेमीटर या प्री-लॅंडिंग कक्षेत प्रवेश करण्यासाठी ‘लुना-२५’ला आदेश दिला.
- १९ ऑगस्ट राेजी दुपारी ४.३० वाजता हा आदेश दिला हाेता.
- मात्र, यान थ्रस्टर फायर करू शकले नाही आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली.
- त्यानंतर सायंकाळी ५.२७ वाजता यानाचा संपर्क तुटला.
- कक्षा बदलताना नियाेजित मार्गावरून यान भरकटले आणि चंद्रावर काेसळले.
२०२७, २०२८ आणि २०३० या वर्षांमध्ये रशिया आणखी तीन चंद्र माेहिमा आखणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात चीनच्या सहकार्याने चंद्रावर मानवी माेहीम आखण्यात येणार आहे. त्यानंतर रशियाची चंद्रावर तळ उभारण्याची याेजना आहे.
- चंद्रावरील मातीचे नमुने घेऊन बर्फाचा शाेध घेणे
- नव्या साॅफ्ट लॅंडिंग आणि अंतराळ तंत्रज्ञानाची चाचणी
- साैर हवेचा परिणाम जाणून घेण्यासाठी प्लाझ्मा-धुलीकणांचा अभ्यास.
आपले चंद्रयान 20 मिनिटांच्या अंतरावर; 23 राेजी साॅफ्ट लॅंडिंग
बंगळुरू : चंद्रयान-३ मोहिमेच्या लँडर मॉड्यूलची (एलएम) कक्षा शनिवारी उशिरा रात्री १ वाजून ५० मिनिटांनी यशस्वीरीत्या कमी करून ते चंद्राच्या जवळ आणल्याचे राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (इस्रो) रविवारी सांगितले. त्यामुळे चंद्र गाठण्यासाठी अंतिम टप्प्यातील २० मिनिटांचा कालावधी उरला आहे. अंतिम टप्पा सुरू करण्यापूर्वी लँडर अंतर्गत तपासण्यांमधून जाईल, असे इस्रोने सांगितले.
चंद्रयानाचा वेग आटाेक्यात
लँडरचा वेग दुसऱ्यांदा आणि अंतिम वेळा कमी (डीबुस्टिंग) करण्यात आला. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:४५ वाजता त्याचा चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्याचा प्रवास सुरू होईल, असे इस्राेने सांगितले.
२३ ऑगस्ट
सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान-३चे यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग होईल, अशी अपेक्षा आहे.
थेट प्रक्षेपण
चंद्रयान-३ च्या लँडरच्या सॉफ्ट लँडिंगच्या क्षणाचे अनेक व्यासपीठांवर संध्याकाळी ५:२७ वाजतापासून थेट प्रक्षेपण केले जाईल.