लंडनमधून चोरलेली आलिशान कार पाकमध्ये, ट्रेसिंग ट्रॅकरच्या मदतीने कार शाेधून काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 06:51 AM2022-09-05T06:51:51+5:302022-09-05T06:54:21+5:30
कार कराचीतील उच्चभ्रू डीएचए सोसायटीतील एका बंगल्याच्या आवारात उभी आहे, अशी माहिती ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीकडून मिळाल्यानंतर पाकच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी या बंगल्यावर छापा मारला.
कराची : लंडनमधून चोरण्यात आलेली जवळपास ३ लाख डॉलरची (२ कोटी ३९ लाख १७ हजार ३९५ भारतीय रुपये) आलिशान बेंटले मल्सैन सेडान कारपाकिस्तानच्या कराची शहरात सापडली आहे.
कार कराचीतील उच्चभ्रू डीएचए सोसायटीतील एका बंगल्याच्या आवारात उभी आहे, अशी माहिती ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीकडून मिळाल्यानंतर पाकच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी या बंगल्यावर छापा मारला. तेव्हा अधिकाऱ्यांना आत कार आढळून आली. चोरांना बेंटलेमधील ट्रेसिंग ट्रॅकर काढता आला नाही. त्यामुळे ब्रिटिश पोलिसांना कारचा अचूक ठावठिकाणा हुडकून काढता आला.
तपासणीत कारचा नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे आढळले. चोरीला गेलेल्या कारच्या चेसीस क्रमांकासह अन्य माहिती पाकिस्तानी सीमाशुल्क विभागाला पुरवली होती. कराचीतील कारचा चेसीस क्रमांक ब्रिटिश पोलिसांनी दिलेल्या चेसीस क्रमांकाशी जुळला.