महिलांना शिक्षा करण्यासाठी इसिसचे यंत्र
By Admin | Published: February 26, 2016 03:55 AM2016-02-26T03:55:20+5:302016-02-26T03:55:20+5:30
मोसूल शहरात महिला वापरत असलेल्या कपड्यांमुळे त्यांचे सगळे शरीर झाकले जात नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा करण्यासाठी इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) धातूचे
बगदाद : मोसूल शहरात महिला वापरत असलेल्या कपड्यांमुळे त्यांचे सगळे शरीर झाकले जात नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा करण्यासाठी इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) धातूचे नवे उपकरण तयार केले आहे. त्याला बायटर (चावणारे) किंवा क्लिपर (कात्री) असे म्हणतात. मोसूल शहरातून याच महिन्यात पळून गेलेल्या माजी शाळा संचालक महिलेने या उपकरणामुळे महिलांना अतिशय वेदना होतात, कारण ते शरीराच्या मांसाचे तुकडे करते, असे सांगितले.
गृहिणी असलेल्या फातिमा (२२) हिने मोसूलमधून पळून जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. तिच्या मुलांची उपासमार होत असल्यामुळे ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत (विशेषत: स्त्रियांबद्दल) इसिस आता अधिक हिंसक व शरीराचा छळ करून आनंद घेत आहे. सध्या फातिमा उत्तर-पूर्व सिरियातील रास अल-अईननजीक विस्थापित झालेल्यांसाठीच्या शिबिरात राहत आहे. गेल्या महिन्यात माझी बहीण हातमोजे घरीच विसरून गेल्यामुळे तिला अतिशय कठोरपणे शिक्षा करण्यात आली, असे फातिमा म्हणाली.
बुरखा घातलाच पाहिजे
महिलांनी पूर्ण बुरखा घातला पाहिजे, बॅगी किंवा ट्राऊझर्स, हात व पायमोजे वापरले पाहिजेत व त्या जेव्हा घराबाहेर पडतील तेव्हा त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असला पाहिजे असा इसिसचा आग्रह आहे. बायटर उपकरणाला धातूचा जबडा असतो व त्यामुळे शरीराला जखम होते.
इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरात अन्न, पाणी, औषधे, इंधन, वीज यांची तीव्र टंचाई असून तेथील दैनंदिन जीवनाचा दर्जा खालावला आहे. तान्ह्या बाळांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून तेथे दूध नाही. एक किलो तांदळाची किंमत दहा डॉलर झाली आहे. या प्रदेशावर सरकारी विमाने कधी बॉम्बहल्ला करतील याचा नेम नाही, त्यामुळे नागरिक दहशतीखाली राहतात.