बुध ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र सुमारे चार अब्ज वर्षे जुने
By admin | Published: May 9, 2015 12:04 AM2015-05-09T00:04:54+5:302015-05-09T00:04:54+5:30
नासाचे अवकाश यान मेसेंजर बुध ग्रहाच्या पृष्ठभागाला धडकले असून, या यानाने दिलेल्या माहितीनुसार बुध ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र चार अब्ज वर्षांपूर्वीचे आहे
टोरंटो : नासाचे अवकाश यान मेसेंजर बुध ग्रहाच्या पृष्ठभागाला धडकले असून, या यानाने दिलेल्या माहितीनुसार बुध ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र चार अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याच्या अगदी जवळ असणाऱ्या बुध ग्रहासंदर्भात माहिती हाती लागली आहे. आतापर्यंत बुध ग्रहाची फारशी माहिती नव्हती.
नासाचे मेसेंजर हे अवकाश यान २००४ साली प्रक्षेपित करण्यात आले होते. २००८ साली प्रथम ते बुधाजवळून गेले. २०११ पासून हे अवकाश यान बुध ग्रहाच्या कक्षेत फिरत असून, २०१४ च्या अखेरीस व २०१५ च्या सुरुवातीस बुधाच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून गेले आहे. यावेळी हे यान बुधाच्या पृष्ठभागापासून १५ कि.मी. अंतरावर होते. सौरमालिकेत पृथ्वी सोडता चुंबकीय क्षेत्र असणारा बुध हा एकमेव ग्रह आहे. मंगळावरही कधीकाळी चुंबकीय क्षेत्र होते, पण ते तीन अब्ज वर्षांनंतर लुप्त झाले आहे. बुधाचे चुंबकीय क्षेत्र ३.९ अब्ज वर्षांपूर्वीचे असून, बुधाची निर्मिती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली असून, पृथ्वीच्या निर्मितीचाही हाच काळ आहे. (वृत्तसंस्था)