पाकिस्तानातही 'हर-हर महादेव'! अशा पद्धतीनं सुरू आहे हिंदूंचं महाकुंभ सेलिब्रेशन; बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:31 IST2025-01-31T16:31:35+5:302025-01-31T16:31:35+5:30
Mahakumbh 2025 in Pakistan : पाकिस्तानी युट्यूबर हरचंद राम याने आपल्या ब्लॉगमध्ये या अनोख्या आयोजनाची झलक दाखवली आहे.

पाकिस्तानातही 'हर-हर महादेव'! अशा पद्धतीनं सुरू आहे हिंदूंचं महाकुंभ सेलिब्रेशन; बघा VIDEO
Mahakumbh 2025 in Pakistan : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची चर्चा जगभरात सुरू आहे. कुंभमेळ्यात जगभरातील कोट्यवधी भाविक गंगास्नान करत असतात. मात्र, पाकिस्तानातीलहिंदूंना व्हीसा संबंधीत समस्येमुळे यात सहभागी होता येत नाही. यामुळे पाकिस्तानातीलहिंदू बंधूंनी आपला एक वेगळा कुंभमेळा आयोजित केला आहे. यात गंगेच्या पाण्याने अंघोळ करून ते आपला भाव प्रकट करत आहेत.
पाकिस्तानी युट्यूबर हरचंद राम याने आपल्या ब्लॉगमध्ये या अनोख्या आयोजनाची झलक दाखवली आहे. रहीमयार खान जिल्ह्यात झालेल्या या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या एका पुजाऱ्याने, आम्ही भारतातील प्रयागराज येथे जाऊ शकत नाही. यामुळे आम्ही येथेच महाकुंभचे सेलिब्रेशन केले. जो 144 वर्षांनंतर आला आहे आणि कदाचित आमच्या आयुष्यातील अखेरचा कुंभमेळा असेल. महाकुंभमेळ्यात गंगास्नानाचे विशेष महत्व आहे. मात्र, पाकिस्तातील हिंदूंना भारतात जाऊन गंगा स्नान करणे अवघड आहे. यामुळे भारतातून गंगेचे पाणी आणून ते येथील पाण्यात टाकण्यात आले आहे.
पाकिस्तानात कुंडस्नान विधी -
पाकिस्तानात गंगा नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी एक तलाव बांधण्यात आला आहे, त्यातील पाण्यात गंगेचे पाणी टाकण्यात आले आहे. भाविक त्यात उभे राहून स्नान करत आहेत. त्यांना गंगास्नानाचा अनुभव घेता यावा, यासाठी पुजारी त्यांच्या अंगावर पाणी टाकत आहेत.
भाविकांसाठी प्रसादवितरणाचे आयोजन -
स्नानानंतर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. सर्वांसाठी खिचडी तयार करण्यात आली होती. जी नंतर सर्वांना प्रसाद रुपात वितरित करण्यात आली. धार्मिक विधी दरम्यान, भक्तांनी त्यांच्या गुरूंचे चरणस्पर्श केले आणि आशीर्वाद घेतले. छोट्या प्रमाणावर आयोजित केलेल्या या महाकुंभात भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. स्नान करताना एका भक्ताने सांगितले की आपण प्रयागराजला जाऊ शकत नाही मात्र, गंगेच्या पाण्याने स्नान करून आपल्याला तशीच अनुभूती मिळत आहे.