सोन्याची कडा असलेला महात्मा गांधींचा चष्मा लिलावात, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 09:12 AM2020-08-10T09:12:18+5:302020-08-10T09:12:53+5:30
दक्षिण-पश्चिमी इंग्लंडच्या उपनगरातील हनहम येथील कंपनी ईस्ट ब्रिस्टल ऑक्शंसने रविवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले
लंडन - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्यालंडनमधील चष्म्याच्या जोडीचा लिलाव करण्यात येत आहे. या चष्म्याला सोन्याच्या कडा असून महात्मा गांधींनी तो चष्मा परिधान केला होता. त्यानंतर, सन 1900 व्या वर्षात हा चष्मा लंडनमधील एका कुटुंबास गांधीजींनी भेट दिला होता. गांधीजींच्या या चष्म्यांचा लिलाव 10-15 हजार पाऊंड म्हणजे भारतीय मुल्यानुसार 9.77 ते 14.66 लाख रुपयांपर्यंत होईल, असे सांगण्यात आले आहे.
दक्षिण-पश्चिमी इंग्लंडच्या उपनगरातील हनहम येथील कंपनी ईस्ट ब्रिस्टल ऑक्शंसने रविवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आमच्याकडील डाकपेटीत असलेल्या या चष्म्याचा एवढा सुवर्ण इतिहास असल्याचे समजल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटले. इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हे चष्मे भेट दिले होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना 1910-30 मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती, असे लिलावकर्त्याने सांगितले.
महात्मा गांधीच्या खासगी चष्म्याची जोडी या मथळ्याखाली 21 ऑगस्ट रोजी गांधीजींच्या या चष्म्याच्या जोडीचा लिलाव होत आहे. ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव होत असून अनेक ग्राहकांना या चष्म्याने आकर्षित केले आहे. भारतीयांना या चष्म्याच्या खरेदीसाठी विशेष उत्साह असल्याचे दिसून येते. आत्ताच, 6 हजार पाऊंडला या चष्म्याची ऑनलाईन मागणी करण्यात आली आहे.