महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षाचा तुरुंगवास; व्यावसायिकाला ६२ लाखांचा लावला चुना, कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 09:34 AM2021-06-08T09:34:45+5:302021-06-08T16:30:08+5:30
स्वत:ला व्यावसायिक असल्याचं भासवत आशिष लताने स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक करत त्यांच्याकडून ६२ लाख रुपये हडपले.
दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पणतीला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. ५६ वर्षीय आशिष लता रामगोबिन यांना डरबनच्या एका कोर्टाने ६० लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ७ वर्षाची शिक्षा सुनावली असून त्यांना जेलमध्ये पाठवलं आहे. सोमवारी कोर्टाने त्यांचा निर्णय सुनावत आशिष लता रामगोबिनला दोषी ठरवलं आहे.
स्वत:ला व्यावसायिक असल्याचं भासवत आशिष लताने स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक करत त्यांच्याकडून ६२ लाख रुपये हडपले. या घटनेतील पीडित एसआर महाराज यांनी सांगितले की, नफ्याचं आमिष दाखवून माझ्याकडून पैसे घेण्यात आले. व्यावसायिक एसआर महाराज यांनी आशिष लता यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. महाराजने लता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लिअर करण्यासाठी ६२ लाख रुपये दिले होते. परंतु अशाप्रकारे कोणतंही कन्साइमेंट नव्हतं. होणाऱ्या नफ्यातून काही वाटा एसआर महाराज यांना देऊ असं आमिष लताने दिलं होतं.
व्यावसायिकासोबत विश्वासघात
लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची मुलगी आहे. लता यांना डरबन विशेष व्यावसायिक क्राईम कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षेविरोधात अपील करण्यास परवानगी नाकारली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले की, लता रामगोबिन यांची न्यू आफ्रिकेतील अलायंस फुटविअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक एसआर महाराज यांच्यासोबत ऑगस्ट २०१५ मध्ये भेट झाली होती.
महाराज यांची कंपनी लिननचे कपडे आणि बूट आयात, उत्पादन आणि विक्री करतं. त्याचसोबत त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रोफिट शेअरच्या आधारे पैसे देते. लता रामगोबिन यांनी महाराज यांना सांगितले की, त्यांनी दक्षिण आफ्रीकी हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी लिननच्या कपड्यांचे ३ कंटेनर भारतातून आयात केले आहेत.
फसवणुकीतून उकळले पैसे
कोर्टाने सांगितले की, लता यांनी एसआर महाराज यांना आयात आणि सीमाशुल्क भरण्यासाठी पैसे कमी पडतायेत आणि बंदरावर सामान खाली करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे असं सांगितले. या कामासाठी ६२ लाख रुपयांची गरज आहे. स्वत:चं म्हणणं सिद्ध करण्यासाठी लता रामगोबिन यांनी खरेदी केलेला करार आणि ऑर्डर पावती दाखवली. परंतु महाराज यांना अखेर समजलं की, लताने दाखवलेली सर्व कागदपत्रे बनावट आणि खोटी आहेत. त्याआधारे त्यांनी लता रामगोबिन यांच्याविरोधात खटला दाखल केला. NGO इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन वायलेंसमध्ये कार्यकारी संचालक असणाऱ्या रामगोबिनने स्वत:ला पर्यावरण, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता असल्याचं सांगितले. इला गांधी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामासाठी अनेकदा सन्मानित करण्यात आलं आहे.