गांधीजींच्या पुतळ्याची नेदरलँडस्मध्ये विटंबना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:17 AM2020-06-19T00:17:36+5:302020-06-19T00:18:22+5:30
अमेरिकेपाठोपाठ युरोपात पसरले लोण
अॅमस्टरडॅम : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे लोण आता अमेरिकेतून युरोपात पोहोचले आहे. नेदरलँडस्ची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये अज्ञात बदमाशांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. या पुतळ्याला बदमाशांनी स्प्रेद्वारे रंग फासला.
डच वृत्तपत्र ‘मेट्रो’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, अॅमस्टरडॅममधील चर्चिलान येथे असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केली. पुतळ्याच्या चौथऱ्यावर ‘वर्णद्वेषी’ अशी टिपणी अज्ञातांनी ठळकपणे दिसेल, अशी लिहिली.
शहराच्या एका अधिकाºयाने सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या तोडफोडीच्या विरोधात आहोत. अशा प्रकारची विटंबना अस्वीकारार्ह आहे. प्रतिमेची स्वच्छता करण्यात येईल.
या विटंबनेमागे कोण आहे, याचा शोध अद्याप लागलेला नाही. पुतळ्याची देखभाल करणाºया संस्थेच्या एका कर्मचाºयाने सांगितले की, पुतळ्याच्या सफाईला अनेक तास लागू शकतात.
सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या एका ७५ वर्षीय व्यक्तीला पुतळ्याची विटंबना झाल्याचे लक्षात आले. या व्यक्तीने सांगितले की, मी ४० वर्षांपासून येथे राहतो. मी यापूर्वी असे कधीही पाहिले नाही. मी अनेक वर्षांपासून हा पुतळा पाहतो.
१९९० मध्ये गांधीजींच्या १२१ व्या जयंती दिनी चर्चिलानमध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.