बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 7 सैनिक मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 09:53 PM2020-12-27T21:53:51+5:302020-12-27T21:54:11+5:30
Pakistan news: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे.
इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तान पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त व्हावा यासाठी तेथील नागरिकांनी हा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराला हे लोक वैतागले असून यामध्ये 7 सैनिक मारले गेले आहेत. यामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
बलुचिस्तानमधील हरनाईमधील शारिंग पोस्टवर हा हल्ला झाला आहे. यामध्ये सात सैनिक मारले गेले आहेत. यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्य़ासाठी पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण भागात पुन्हा अत्याचार सुरु केले आहेत. पाकिस्तानी सैन्य सामान्य माणसांच्या घरात घुसून त्यांच्यासोबत अभद्र वागते. त्यांना विरोध केल्यात दहशतवाद्याचा ठपका ठेवून गोळी झाडून मारले जाते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, रात्री उशिरा सैन्याच्या पोस्टवर झालेल्या हल्ल्यात ७ सैनिक शहीद झाले, हे ऐकून दु:ख झाले. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती आहेत. आमचा देश साहसी सैनिकांसोबत उभा आहे, जे भारत समर्थित दहशतवाद्यांचा सामना करतात.
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच पंजपूर जिल्ह्यात सैन्याच्या एका ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तानी कर्नलसह ८ जण जखमी झाले होते. पाकिस्तानी सैन्यावर मे नंतरचा हा तिसरा हल्ला होता. बलुचिस्तानी नागरिक आता कराचीसह अन्य भागातही पाकिस्तानी लष्करावर हल्ले करू लागले आहेत.