बांगलादेशात मोठे बदल, मुजीबुर रहमान यांच्या हौतात्म्य दिनाची सुट्टी रद्द; शेख हसीनांच्या जवळच्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 12:26 PM2024-08-14T12:26:37+5:302024-08-14T12:28:10+5:30
बांगलादेशमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९७५ रोजी बंगबंधू मुजीबूर रहमान यांची हत्या झाली. त्याच्यासह कुटुंबातील आणखी ४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सुट्टी आणि शोक दिन साजरा केला जातो.
बांगलादेशातील सत्तापालटानंतरही मोठे बदल करण्यात आले आहेत. मुजीबूर रहमान यांचा वारसा कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आहे. मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकारही या कट्टरतावाद्यांसमोर झुकताना दिसत आहे. आता शेख मुजीबुर रहमान यांच्या शहीद दिनी १५ ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी नसेल हा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस बांगलादेशमध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा केला जात होता. १५ ऑगस्ट १९७५ रोजी बंगबंधू मुजीबूर रहमान यांची हत्या झाली. त्यांच्यासह कुटुंबातील आणखी ४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सुट्टी आणि शोक दिन साजरा केला जातो.हा दिवस आता साजरा केला जाणार नाही.
सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस यांनी मुजीबच्या यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शोक दिनी सुट्टी नसल्याची घोषणा केली आहे. सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी हिंसक आंदोलनादरम्यान शेख मुजीब यांचा पुतळा फोडण्यात आला होता आणि ज्या खोलीत ते शहीद झाले होते, त्या खोलीलाही आग लावण्यात आली होती. त्या खोलीचे सध्या संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी शेख मुजीब यांच्या आठवणी पुसण्यास विरोध केला आहे. पंतप्रधानपद सोडून भारतात आलेल्या शेख हसीना यांनी मंगळवारी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले.
शेख हसीना म्हणाल्या की, निषेधाच्या नावाखाली बांगलादेशात अशांतता पसरली आणि बंगा बंधूंच्या स्मारकांना लक्ष्य करण्यात आले. आता त्यांच्या नावाने सुट्टी रद्द केल्याने अवामी लीग समर्थकांमधील असंतोष आणखी वाढू शकतो. सरकारने सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी अवामी लीगचे नेते यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. शेख हसीना यांच्या जवळच्या लोकांनाही अटक केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
सलमान एफ हे शेख हसीना यांचे सल्लागार होते. सलमान यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय माजी कायदा मंत्री अनिसुल हक यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हे लोक जलमार्गातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पकडले. या दोघांविरुद्ध दोन जणांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढाका येथील न्यू मार्केट परिसरात ढाका कॉलेजजवळ झालेल्या हिंसाचारात दोन जण ठार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याअंतर्गत या दोन नेत्यांना अटकही करण्यात आली आहे.