अमेरिकेच्या अण्वस्त्र शस्त्रागारावर मोठा सायबर हल्ला, गोपनीय माहितीची हॅकर्सकडून चोरी
By बाळकृष्ण परब | Published: December 18, 2020 08:55 AM2020-12-18T08:55:33+5:302020-12-18T08:58:13+5:30
cyber attack on US nuclear agency : जगातील सर्वात मोठा अण्वस्त्रसंपन्न देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. अमेरिकेकडे हजारो अण्वस्त्रे असून, त्यांची सुरक्षादेखील तितकीच कडेकोट आहे. मात्र... v
वॉशिंग्टन - जगातील सर्वात मोठा अण्वस्त्रसंपन्न देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. अमेरिकेकडे हजारो अण्वस्त्रे असून, त्यांची सुरक्षादेखील तितकीच कडेकोट आहे. मात्र अमेरिकेच्या या अवस्त्रसाठ्याची देखरेख करणाऱ्या राष्ट्रीय अण्वस्त्र संरक्षण प्रशासन (एनएनएसए) आणि ऊर्जा विभाग (डीओई) च्या नेटवर्कची सुरक्षा भेदत हॅकर्सनी त्यावर मोठा सायबर हल्ला केला आहे. या हॅकर्सनी मोठ्या प्रमाणावर गोपनीय दस्तऐवजांची चोरी केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या सायबर हल्ल्याचा फटका अनेक केंद्रीय एजन्सींना बसला आहे.
अमेरिकी मीडिया पॉलिटिकोने दिलेल्या वृत्तानुसार ऊर्जा विभागाचे मुख्य माहिती अधिकारी रॉकी कँपियोन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रीय अण्वस्त्र संरक्षण प्रशासन आणि ऊर्जा विभागाच्या टीमने हॅकिंगबाबची सर्व माहिती यूएस काँग्रेस समितीला पाठवली आहे. लवकरच सरकारकडून याबाबत सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
ज्या संस्थांमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांनी संशयास्पद हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. त्यामध्ये न्यू मेक्सिको आणि वॉशिंग्टनची फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन (एफईआरसी), सँडिया राष्ट्रीय प्रयोगशाळा न्यू मेक्सिको आणि लॉस अलामोस राष्ट्रीय प्रयोगशाळा, वॉशिंग्टन, राष्ट्रीय अण्वस्त्र संरक्षण प्रशासनाचे सुरक्षित परिवहन कार्यालय आणि रिचलँड फिल्ड कार्यालय यांचा समावेश आहे. हे सर्व विभाग अमेरिकेच्या अण्वस्त्र हत्यारांचे साठे निंयंत्रित करतात आणि सुरक्षित वाहतुकीची निश्चिती करतात.
दरम्यान, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे हॅकर्स अन्य एजन्सींपेक्षा फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशनला अधिक नुकसान पोहोचवू शकतात. या एजन्सीच्या नेटवर्कमध्ये घुसखोरीचे सर्वाधिक पुरावे सापडले आहेत. याबाबत सायबर सिक्यॉरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सिक्योरिटी एजन्सी हॅकिंगबाबतच्या हालचालींचा तपास करण्यामध्ये अमेरिकेच्या फेडरल सर्व्हिसेसना मदत करत आहेत.
अमेरिकेची सायबर सुरक्षा ट्रम्प यांच्या कार्यकाळात कमकुवत झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या सायबर हल्ल्यात किती डेटा चोरी झाला याची माहिती अधिकाऱ्यांना मिळू शकलेली नाही. पुढच्या काही दिवसांत नेटवर्कमधून किती माहितीची चोरी झाली याचा शोध लावला जाईल, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.