जपानमध्ये पुन्हा एकदा जोरदार भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 04:04 PM2024-01-09T16:04:55+5:302024-01-09T16:05:43+5:30
या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आणि मृतांची संख्या 200 च्या वर गेली. अधिकाऱ्यांनी सांगितले की 100 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.
जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मध्य जपानमध्ये मंगळवारी 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला, परंतु अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. जपानच्या हवामान एजन्सीने सांगितले की, जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर भूकंप झाला. दरम्यान, जपानमध्ये गेल्या 1 जानेवारीला मध्य जपानच्या काही भागांना शक्तिशाली भूकंपाने उद्ध्वस्त केले होते. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आणि मृतांची संख्या 200 च्या वर गेली. अधिकाऱ्यांनी सांगितले की 100 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.
या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये धोकादायक भूकंप झाला होता. 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाने देशभरात हाहाकार माजवला. त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. तसेच भविष्यात आणखी भूकंप होण्याची शक्यता वर्तविली होती. 1 जानेवारीला झालेल्या भूकंपात आतापर्यंत 161 जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो दुकाने व घरांचे नुकसान झाले. 1 जानेवारीला झालेल्या भूकंपानंतर अनेक घरांमध्ये विजेचे संकट आले आहे. जपानच्या इशिकावा प्रांतातील रहिवाशांना वीजपुरवठा खंडित होत आहे. अॅनामिझूमधील 1,900 घरे वीजविना होती आणि इशिकावा प्रांतातील सुमारे 20,000 घरे वीजविना होती. दूरध्वनी सेवाही बंद आहे.
भूस्खलनाच्या धोक्याचा इशारा
एका आठवड्यापूर्वी जपानच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या भूकंपामुळे रात्रभर बेघर झालेले हजारो लोक थकवा आणि अनिश्चिततेच्या अवस्थेत जगत आहेत. 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर बचावाच्या प्रयत्नांमध्ये सोमवारी हजारो सैनिक, अग्निशमन दल आणि पोलीस ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांचा शोध घेत होते. इशिकावा प्रांतातील नोटो द्वीपकल्पात भूस्खलनाच्या धोक्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे, जेथे भूकंप झाला. बर्फवृष्टीमुळे हा धोका वाढला आहे.
भूकंपानंतर 30,000 लोक बेघर
भूकंपात मृत्यू झालेल्यांपैकी 70 वाजिमा, 70 सुझू, 11 अनामिझू आणि उर्वरित चार शहरांमधील लोकांचा समावेश आहे. जवळपास 103 लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर 565 जखमी आहेत आणि 1,390 घरे उद्ध्वस्त झाली आहेत किंवा लक्षणीय नुकसान झाले आहे. भूकंपानंतर सुमारे 30,000 लोक शाळा, सभागृहे आणि इतर निर्वासन केंद्रांमध्ये राहत आहेत आणि त्यांना कोविड-19 संसर्ग आणि इतर आजारांची चिंता आहे.