"इस्रायलचा विनाश आता कुणीही रोखू शकत नाही, त्यांना शिक्षा मिळणारच"; इराणने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:32 IST2024-08-08T13:23:19+5:302024-08-08T13:32:57+5:30
Iran vs Israel, Hamas Leader Assassination: इस्रायलने दहशतवादी कारवाया वाढवल्यात कारण त्यांना त्यांचा नायनाट दिसतोय, असेही इराणचे मेजर जनरल अब्दोलराहिम मौसावी म्हणाले.

"इस्रायलचा विनाश आता कुणीही रोखू शकत नाही, त्यांना शिक्षा मिळणारच"; इराणने दिला इशारा
Iran vs Israel, Hamas Leader Assassination: इराणच्या लष्कराचे कमांडर-इन-चीफने यांना इस्रायलला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इस्रायलने केलेल्या चुकांबद्दल आणि गेल्या बुधवारी तेहरानमध्ये पॅलेस्टाईनच्या वरिष्ठ नेत्याच्या हत्येबद्दल त्यांना शिक्षा भोगावीच लागणार. इस्रायलचा विनाश आता रोखला जाऊ शकत नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया इराणचे मेजर जनरल अब्दोलराहिम मौसावी ( Major General Abdolrahim Mousavi ) यांनी दिली. इराणने एप्रिलमध्ये इस्रायलविरुद्ध प्रत्युत्तरादाखल एक कारवाई केली होती. आता यापुढे केले जाणारे हल्ले हे त्यापेक्षाही अधिक गंभीर आणि मोठ्या स्वरुपाचे असतील, असेही त्यांना ठणकावून सांगितले.
इराणच्या दक्षिणेकडील बंदर अब्बास येथे एका समारंभात मेजर जनरल अब्दोलराहिम मौसावी म्हणाले की इस्रायली राजवटीने आपल्या दहशतवादी कारवाया वाढवल्या आहेत कारण त्यांना त्यांच्या विनाशाचा वेग कळला आहे आणि अशा गोष्टी करून ते स्वतःचा विनाश शक्य तितका लांब ढकलू इच्छित आहेत. पण त्यांच्या चुका त्यांना भोवणार आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही ते स्वतःचा विनाश होण्यापासून वाचवू शकत नाहीत.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी अब्दोलराहिम मौसावी इराणची राजधानी तेहरानच्या अधिकृत दौऱ्यावर होते. इराणच्या म्हणण्यानुसार हमास ही पॅलेस्टाइन प्रतिकार चळवळ असून त्याच्या राजकीय ब्युरोचे प्रमुख इस्माईल हनीया यांची इस्रायलने हत्या केली. जनरल मौसावी म्हणाले की, मारल्या गेलेल्या हमास नेत्याच्या जागी गाझामधील प्रतिकार चळवळीचे नेते याह्या सिनवार यांची नियुक्ती करणे हा मोठा संदेश आहे. प्रतिकार आणि संघर्षासाठी शूर आणि धाडसी असलेल्या चळवळीचा यात दृढनिश्चय दिसून येतो.