दक्षिण गाझामध्ये इस्रायलचा मोठा हल्ला, 45 पॅलेस्टिनी नागरिक ठार, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:03 AM2023-12-06T09:03:12+5:302023-12-06T09:04:17+5:30
गेल्या 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे 16 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील काही दिवसांच्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने दक्षिण गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात 45 लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे 16 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायली सैन्याने सांगितले की, युद्धविरामानंतर दक्षिण गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासूनचा हा सर्वात वेगवान हल्ला होता. इस्रायली सैन्याने जबलिया, पूर्व शुजैया आणि खान युनिसमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे हमासने सांगितले की, आमच्या सैनिकांनी 24 इस्रायली लष्करी वाहने नष्ट केली आहेत. यासोबतच स्नाइपर्सनी इस्त्रायली सैन्याच्या जवानांनाही लक्ष्य केले आहे, ज्यामुळे अनेक जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, इस्रायली सैन्याने घरांवर हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 45 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे सांगण्यात येत आहे. हमासच्या मीडिया रिपोर्टनुसार, या लढाईत आतापर्यंत 7112 मुले आणि 4885 महिलांचा मृत्यू झाला आहे. यासह, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण 16,248 लोक मारले गेले आहेत आणि हजारो बेपत्ता आहेत.
आयडीएफने रुग्णालये, निर्वासित शिबिरे आणि शहरात नवीन सूचना असलेली पत्रके जारी केली आहेत. त्यामध्ये घराबाहेर पडू नका, बाहेर पडणे खूप धोकादायक आहे, असे लिहिले आहे. इस्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल हरजी हालेवी यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर गाझामधील अनेक भाग दहशतवादमुक्त करण्यात आले आहेत. आम्ही आता दक्षिणेतील हमासच्या विरोधात कारवाई करत आहोत. हमासच्या सर्वोच्च कमांडर्सना संपवणे हे आमचे ध्येय आहे.