Pakistan Army: पाकिस्तानी सैन्य़ात मोठे फेरबदल; ISI प्रमुखाला बढती, भविष्यात लष्करप्रमुख होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:29 PM2021-10-06T19:29:36+5:302021-10-06T19:31:15+5:30
Pakistani army Officer Transfer: पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना विचारून या बदल्या केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या आयएसपीआरने याची माहिती दिली आहे.
इस्लामाबाद: भारत आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमेवर वाढत चाललेला तणाव पाहता पाकिस्तानी (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये (army Officer Transfer) मोठे फेरबदल केले आहेत. पाकिस्तानचीआयएसआयला नवीन संचालक देत आपल्या मर्जीतील आणि पुढील सैन्य प्रमुख होण्याची शक्यता असलेल्या फैज हामिद यांना बढती देण्यात आली आहे.
लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांना आयएसआयचा नवा डायरेक्टर जनरल नियुक्त करण्यात आले आहे. तर या पदावर असलेल्या फैज हामिद यांना पेशावर कोर कमांडरपदी बढती देण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या आयएसपीआरने याची माहिती दिली आहे. लेफ्टनंट जनरल मोहम्मद सईद यांना कराची कोअर कमांडर बनविण्यात आले आहे. नौमान महमूद यांना राष्ट्रीय संरक्षण विश्वविद्यालयाचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे. मेजर जनरल असीम मलिक यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना विचारून या बदल्या केल्या आहेत. पंतप्रधानांना आयएसआय प्रमुख निवडण्याचा विशेषाधिकार आहे. फैज हामिद यांना १६ जून 2019 मध्ये आश्चर्यजनकरित्या आयएसआय प्रमुख बनविण्यात आले होते. त्यांनी याआधी अंतर्गत सुरक्षा विभागात काम केले होते. हामिद हे बलूच रेजिमेंटचे आहेत. तसेच इम्रान खान यांचे खास आहेत. 2022 मध्ये बाजवांचा कार्यकाळ संपत आहे. पाकिस्तानात निवडणूक होणार आहे,. त्यापूर्वीच इम्रान खान फैज हामिद यांना पाकिस्तानी लष्कराची सुत्रे हाती देण्याची शक्यता आहे.