करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यास तयार राहा; ट्रम्प यांची इराणला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 06:02 IST2025-04-01T06:01:56+5:302025-04-01T06:02:22+5:30
Donald Trump Threatens Iran: इराणने अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेशी करार करावा, अन्यथा इराणवर बॉम्बहल्ले करू, तसेच त्या देशावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यास तयार राहा; ट्रम्प यांची इराणला धमकी
वॉशिंग्टन - इराणने अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेशी करार करावा, अन्यथा इराणवर बॉम्बहल्ले करू, तसेच त्या देशावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेबरोबर कोणत्याही वाटाघाटी करण्यास इराणने गेल्या आठवड्यात स्पष्ट नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे उद्गार काढले.
ट्रम्प यांनी सांगितले की, इराणने करार केला नाही तर त्यांच्यावर अमेरिका बॉम्बहल्ले करू शकते. इराणने याआधी पाहिले नसतील असे भीषण बॉम्बहल्ले आम्ही तिथे करू. त्यांच्यावर आणखी निर्बंध लादण्याची शक्यता आहे.
इराणवर परिणाम नाही
इराणने ओमानच्या माध्यमातून ट्रम्प यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्हाला अमेरिकेशी थेट चर्चा करण्याची इच्छा नाही. अमेरिकेने टाकलेला प्रचंड दबाव, लष्करी कारवाईचा दिलेला इशारा याचा आपल्यावर काहीही परिणाम झालेला नाही, हे इराणने दाखवून दिले आहे.
अमेरिकेशी अप्रत्यक्ष चर्चा आताही सुरू - इराण
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी रविवारी सांगितले की, अमेरिकेशी आमची अप्रत्यक्ष चर्चा नेहमीच होत असते. तशी ती आताही सुरू आहे. अमेरिकेबरोबर इराणचा २०१५ साली एक करार झाला होता. त्याद्वारे इराणच्या अणुकार्यक्रमावर कठोर बंधने घालण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात इराणसोबतच्या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘रशियाचे तेल विकत घेणाऱ्यांवर वाढीव शुल्क’
युक्रेनचे युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेने सुरू ठेवलेल्या प्रयत्नांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी खो घालण्याचे प्रयत्न केले तर रशियाकडून तेल विकत घेणाऱ्यांवर २५ ते ५० टक्के शुल्क आकारण्याचा अमेरिका विचार करत असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी हा इशारा दिला. ट्रम्प यांनी असे निर्बंघ घातले तर त्याचा फटका भारतालाही
बसू शकतो.