‘मेक इन इंडिया’साठी चीनलाही साद
By admin | Published: May 17, 2015 02:11 AM2015-05-17T02:11:57+5:302015-05-17T02:11:57+5:30
चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधून चिनी गुंतवणुकदारांना भारतातील बदललेल्या स्थितीत ‘मेक इन इंडिया’त सहभागी होण्याची साद घातली.
२२ अब्ज डॉलरचे २६ करार : मोदींचे चिनी गुंतवणूकदारांना आवाहन
शांघाय : तीन दिवसांचा दौरा आटोपून मंगोलियाकडे रवाना होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय येथे चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधून चिनी गुंतवणुकदारांना भारतातील बदललेल्या स्थितीत ‘मेक इन इंडिया’त सहभागी होण्याची साद घातली. एवढेच नाही तर या वेळी भारत आणि चिनी कंपन्यांदरम्यान २२ अब्ज डॉलरचे २६ करारही झाले. फुदान विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासनाचे उद्घाटन करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
चीनच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या शेवटी त्यांनी शांघाई येथे भारतीय समुदायाला मार्गदर्शन केले. अमेरिकेतील मेडीसन स्क्वेयर येथे आयोजित कार्यक्रमाप्रमाणे शांघाई येथील मोदी यांच्या स्वागत समारंभाला चीनमधील ५ हजारांहून अधिक भारतीय उपस्थित होते. त्यांचे भाषण चालू असताना अधूनमधून ‘मोदी... मोदी...’ अशा घोषणा निनादत होत्या. सरकारच्या वर्षपूर्तीचा संदर्भ देत त्यांनी विदेश दौऱ्यांवरून भारतात सुरू असलेल्या टीकेचा समाचार येथे स्थायिक झालेल्या भारतीयांपुढे बोलताना घेतला.