मलालाला तालिबान्यांची धमकी
By admin | Published: October 13, 2014 02:54 AM2014-10-13T02:54:19+5:302014-10-13T02:54:19+5:30
नोबेल पुरस्काराने गौरविली गेल्यानंतर अवघ्या काही तासांत मलाला युसूफझाई (१७) हिला तहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने ती ‘इस्लामची शत्रू’ असल्याचे सांगून धमकी दिली आहे.
इस्लामाबाद : नोबेल पुरस्काराने गौरविली गेल्यानंतर अवघ्या काही तासांत मलाला युसूफझाई (१७) हिला तहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने ती ‘इस्लामची शत्रू’ असल्याचे सांगून धमकी दिली आहे.
२०१४ चा नोबेल पुरस्कार मलाला व भारतीय सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर झाला आहे. दोन वर्षांपूर्वी मलालावर याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्यांनी हल्ला केला होता. मलाला ही नास्तिकांचा प्रचार करीत असल्यामुळे तालिबानांचे धारदार सुरे तिच्यासाठी तयार आहेत, असे तालिबानचे प्रवक्ते एहसानुल्लाह एहसान यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.
तालिबान्यांची सत्ता असलेल्या स्वात प्रांतात मलाला हिने मुलींना शिक्षण मिळण्यासाठी काम केले होते. शिवाय तालिबान्यांविरुद्ध बीबीसी उर्दू ब्लॉगवर लिहिले होते. त्यानंतर तिच्या डोक्यात तालिबान्यांनी गोळ्या घातल्या होत्या. तिने ‘आय एम मलाला : द गर्ल हू स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड वॉज शॉट बाय द तालिबान’ हे आठवणींचे पुस्तक ख्रिस्तिना लँब यांच्यासह लिहिले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी मलालाला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाषणासाठी निमंत्रित केले होते. इंग्लडच्या राणीनेही तिला भेटीसाठी बोलावले होते. (वृत्तसंस्था)