चिंता वाढली! मलेशियात सापडलेल्या दहापट घातक कोरोना विषाणूचं 'भारत कनेक्शन' समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 08:57 AM2020-08-18T08:57:32+5:302020-08-18T09:01:53+5:30
मलेशियात सापडलेलं कोरोनाचं नवं रूप १० पटीनं अधिक घातक
नवी दिल्ली: मलेशियात कोरोना विषाणूचं नवं रुप (स्ट्रेन) सापडलं आहे. हा विषाणू जगात इतरत्र सापडलेल्या कोरोना विषाणूपेक्षा दहापटीनं घातक आहे. त्यामुळे वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे. कोरोनावरील लस शोधून काढण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच आता अधिक जीवघेणा विषाणू समोर आल्यानं वैज्ञानिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मलेशियात कोरोनाचा अधिक घातक विषाणू सापडला आहे. मलेशियात ४५ व्यक्तींना एकमेकांमुळे कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील तीन जणांमध्ये कोरोनाचं नवं रुप (D614G) सापडलं.
मलेशियात तीन व्यक्तींमध्ये कोरोनाचा D614G विषाणू सापडला. यातील एक जण रेस्टॉरंटचा मालक आहे. तो भारतातून मलेशियाला परतला होता. तो १४ दिवस होम क्वारंटिन राहिला नाही. त्यामुळे त्याच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव झाला. या व्यक्तीला पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मलेशियात आणखी एका क्लस्टरमध्येही D614G विषाणू सापडला आहे. या व्यक्ती फिलिपीन्समधून मलेशियाला परतल्या होत्या.
D614G मुळे कोरोना अधिक घातक होतो. कोरोना विषाणू अधिक टोकदार झाल्यानं कोशिकांवर थेट हल्ला होतो. D614G पहिल्यांदा युरोपमध्ये दिसून आला. अमेरिकेतील विषाणूतज्ज्ञ डॉ. फॉसी यांनी या व्हायरसमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो असं म्हटलं आहे. मलेशियाच्या आरोग्य विभागाचे डायरेक्टर जनरल नूर हिशाम अब्दुल्ला यांनी देखील कोरोना व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतात. आतापर्यंत लस तयार करण्यासाठी आणि व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेली नवी पद्धतही यापुढे फेल होऊ शकते. या व्हायरसचा प्रसार हा अनेक देशांमध्येही होऊ शकतो.
मलेशियामध्ये डी 614 जी हा व्हायरस आढळून आल्याने लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. तसंच आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे. मात्र लोकांनी अधिक सावधानता बाळगणं गरजेचं आहे. तरच या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं शक्य होऊ शकतं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 21,824,807 वर पोहोचली आहे. तब्बल 773,032 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला
VIDEO: ड्रॅगनची मोठी नाचक्की; शक्तिप्रदर्शनावेळी बघता बघता रणगाड्याला जलसमाधी