मलेशिया; नजीब रजाक यांच्या घरात सापडल्या पैसे, दागिने भरलेल्या बॅगा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 01:22 PM2018-05-18T13:22:12+5:302018-05-18T13:22:12+5:30
नजीब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नाकारले.
क्वालालंपूर- मलेशियाचे माजी पंतप्रधान आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर निवडणुकीत पराभूत झालेल्या नजीब रजाक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महाथिर मोहंमद यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार मलेशियामध्ये अस्तित्त्वात आल्यावर नजीब आणि त्यांची पत्नी यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या दोन निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये पैसे आणि दागिने भरलेल्या हँडबॅग्ज सापडल्या असून शेकडो महागड्या पर्स जप्त करण्यात आल्या आहेत.
Malaysian police seize 284 boxes containing designer handbags and dozens of bags filled with cash and jewelry from a private residence linked to former prime minister Najib Razak https://t.co/YcXnRGgD6K by @jjsipalanpic.twitter.com/LYor5gBM5b
— Reuters Top News (@Reuters) May 18, 2018
नजीब यांच्या घरामध्ये महागड्या वस्तूंनी भरलेले 284 खोके पोलिसांनी जप्त केले आहेत. विविध नोटांनी भरलेल्या आणि दागिने, महागडी घड्य़ाळे असलेल्या 72 बॅगांचाही या जप्त केलेल्या वस्तूंमध्ये समावेश आहे. या सर्व वस्तूंची किंमत किती होते याची मोजणी करण्यात येत आहे. नजीब यांच्यावर 4.5 अब्ज डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.
मलेशियामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रजाक यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्याबद्दल बोलताना रजाक म्हणाले होते, ' जे झालं ते अत्यंत दुःखदायक आहे मात्र लोकशाहीच्या तत्वांना अनुसरुन एक पक्ष म्हणून हा निकाल स्वीकारावा लागेल'. नजीब आणि त्यांची पत्नी रोस्माह मॅन्सोर यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
नजीब यांचा पराभव 92 वर्षांचे मलेशियन नेते महाथिर मोहंमद यांनी केला. ते लोकशाही पद्धतीने निवडून येणारे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते आहेत. नजीब यांनी मलेशियात 1 मलेशिया डेव्हलपमेंट बर्हार्ड (1एमडीबी ) योजनेत कोट्यवधी डॉलर्सचा भ्रष्टाचार केला असे सांगण्यात येते. महाथिर याबाबत बोलताना म्हणाले होते, ''आम्ही नजीब यांचा राजकीय सूड वगैरे घेण्याच्या विचारात नाही तर आम्ही कायद्याचे राज्य स्थापन करणार आहोत, जर नजीब यांनी काहीतरी चुकीचं केल्याचं कायद्याद्वारे सिद्ध झालं तर त्यांना परिणाम भोगावेच लागतील.'' नजीब आणि त्यांच्या पत्नीवर देश सोडण्याची मनाई केल्यानंतर नजीब यांनी ट्वीट करुन आपण सरकारच्या निर्णयाचा आदर करतो असे म्हटले आहे.