'मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील', 'पद्मावत'च्या रिलीजवर मलेशियामध्ये बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 08:49 AM2018-01-30T08:49:30+5:302018-01-30T08:53:24+5:30

मलेशियामध्ये पद्मावतच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे. 

malaysia bans Padmaavat says it might offend muslims | 'मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील', 'पद्मावत'च्या रिलीजवर मलेशियामध्ये बंदी

'मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील', 'पद्मावत'च्या रिलीजवर मलेशियामध्ये बंदी

Next

नवी दिल्ली - प्रचंड वादविवाद, विरोधानंतर अखेर संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा भारतात रिलीज झाला.  भारतात जरी 'पद्मावत'च्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला असला तरीही मलेशियामध्ये पद्मावतच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे. 
राजपूतांचा अपमान करणारा सिनेमा असल्याचा आरोप करत भारतात करणी सेनेनं पद्मावतविरोधात तीव्र-हिंसक आंदोलनं केली होती. तर दुसरीकडे, मलेशियामध्ये 'इस्लामिक धर्मियांच्या भावना' लक्षात घेत पद्मावतवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डनं देशात संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतच्या रिलीजवर बंदी आणली आहे. ज्या पद्धतीनं सिनेमामध्ये अलाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा सिनेमामध्ये दाखवण्यात आली आहे, त्यानुसार मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचं म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम बहुल देश मलेशियामध्ये सिनेमातील कथा चिंतेचा विषय आहे, असे मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डचे अध्यक्ष मोहम्मद जाम्बेरी अब्दुल अजीज यांनी सांगितले. अजीज यांनी पुढे असेही म्हटले की, सिनेमातील कथेमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि ही बाब मलेशियासारख्या मुस्लिम बहुल देशासाठी चिंतेचा विषय आहे. 
16 व्या शतकातील भारतीय कवी मलिक मोहम्मद जायसी यांनी लिहिलेल्या कथेवरुन पद्मावत सिनेमा साकारण्यात आला आहे. या सिनेमाचे नाव सुरुवातीला पद्मावती असे ठेवण्यात आले होते. मात्र सिनेमाला प्रचंड विरोध करण्यात आला. त्यामुळे सेन्सॉर बोर्डच्या सूचनेनुसार सिनेमाचं नाव पद्मावत असे करण्यात आले.

इतिहासात छेडछाड केल्याचा आरोप करत करणी सेनेनं पद्मावत सिनेमाला तीव्र विरोध दर्शवला होता. राजपूतांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे करण्यात येत असल्याचा आरोप करणी सेनेनं केला होता. सिनेमा रिलीज  होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी हिंसक निदर्शनंदेखील करण्यात आली.  दरम्यान, प्रचंड विरोधानंतरही भारतात 25 जानेवारीला पद्मावत सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला.

शुटिंगच्या वेळी यायच्या अलाउद्दीन खिल्जीसारख्या भावना- रणवीर सिंग

दरम्यान, सिनेमात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहला व त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळते आहे. सिनेमात नकारात्मक भूमिका साकारूनही रणवीरवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तसंच त्याच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.  अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारतानाचा आलेला अनुभव रणवीरने शेअर केला आहे. अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी मी खूप घाबरलो होतो. भूमिकेला न्याय देऊ शकेल का? याबद्दलची मनात भीती होती. ही भूमिका साकारताना दलदलीच उतरावं लागणार याची पूर्ण कल्पना मला होती. पण मीच अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारावी, असा संजय लीला भन्साळी यांचा अट्टहास होता. ते माझे गुरू असल्याने त्यांना नकार देणं मला शक्य नव्हतं, असं रणवीर सिंह म्हणाला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या विश्वासामुळे मी भूमिकेसाठी होकार कळविला. बाजीरावसोबतच या सिनेमाच शुटिंग सुरू झाल्याने दोन्ही भूमिकेत उतरणं कठीण होतं. त्यातच माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने माझं शुटिंग लांबणीवर गेलं. सिनेमातील इतर सगळ्या भूमिकांचं शूटिंग पूर्ण झालं होतं. फक्त माझ्याचं भूमिकेचं शूटिंग बाकी होतं. शेवटच्या 40 दिवसात मी सिनेमाचं शुट पूर्ण केलं. एकाच कॉस्ट्यूम ड्रामामध्ये तुम्हाला सतत 40 दिवस शुट करायला लागतं तेव्हा तुम्ही मनातून खचता. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात नेहमी कलाकारांना त्यांचं स्ट्रेस दूर करण्यासाठी ब्रेक मिळतो. पण मला ब्रेक मिळाला नव्हता. 

मी दररोज 12-14 तास शुटिंग करायचो. त्यावेळी अलाउद्दीन खिल्जीच्या झोनमध्ये गेलो होतो. त्यावेळी माझ्या अंगात फक्त वाईटप्रवृत्ती भरली होती. मी माझ्या कुटुंबीयांशी व मित्रांशी बोलणं बंद केलं होतं. सिनेमाच्या शूटिंगनंतर पुन्हा रणवीर व्हायला मी माझ्या आईशी बोलायला सुरूवात केली. मित्रांशी बोलायला सुरूवात केली. खिल्जीच्या भूमिकेत मी इतक्या खोलात उतरलो होतो की माझ्या मनात त्याच्यासारखेच विचार यायचे. कधीकधी शुटिंग करत नसताना माझ्या मनात खिल्जीसारख्या भावना यायचा. कुणी माझ्या समोर चूक केली की त्याचा गळा दाबायची इच्छा मला व्हायची, असंही रणवीर म्हणाला. मी साकारलेल्या नकारत्मक भूमिकेलाही चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल्याचा आनंद आहे, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. 

Web Title: malaysia bans Padmaavat says it might offend muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.