Malaysia Rohingya: नजरकैदैतून 500 हून अधिक रोहिंग्या पळाले, पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:32 PM2022-04-20T15:32:05+5:302022-04-20T15:32:11+5:30
Malaysia Rohingya: रोहिंग्या निर्वासित छावनीचे गेट आणि बॅरियर ग्रिल तोडून या रोहिंग्यांनी पळ काढला.
Malaysia Rohingya Refugees:रोहिंग्या निर्वासितांच्या छावनीतून 500 हून अधिक रोहिंग्या पळून गेल्या घटना मलेशियात घडली आहे. मलेशियातील उत्तर पेनांग राज्यातील निर्वासित छावनीत नजरकैदेत असलेल्या रोहिंग्यांनी निदर्शने केली. यादरम्यान, पाचशेहून अधिक रोहिग्यांनी दरवाजा आणि बॅरियर ग्रिल तोडून पळ काढला. पण, नंतर पोलिसांनी यातील अनेकांना ताब्यातही घेतले. इमीग्रेशन विभागाने ही माहिती दिली आहे.
362 रोहिग्यांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, मलेशियातील उत्तर पेनांग राज्यात असलेल्या निर्वासितांच्या छावनीतून रोहिग्यांनी पळ काढला. यानंतर पोलिस आणि एजन्सीनी त्यातील 362 जणांना पुन्हा अटक केली. पोलिसांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी फरार कैद्यांबाबत अधिक माहिती न देता उर्वरित कैद्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
मलेशियात असंख्य रोहिंग्या
बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेला मलेशिया देश म्यानमारमधून पळून जाणाऱ्या मुस्लिम रोहिंग्या किंवा बांगलादेशातील निर्वासित शिबिरातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक आवडते ठिकाण आहे. मलेशिया निर्वासितांचा दर्जा देत नाही, परंतु देशात सुमारे 180,000 निर्वासित आहेत. यात समुद्रमार्गे बेकायदेशीरपणे देशात पोहोचणाऱ्यांचाही समावेश आहे.