मुलीवर 600 वेळा लैंगिक अत्याचार करणा-या बापाला होणार 12 हजार वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 06:12 PM2017-08-10T18:12:37+5:302017-08-10T18:15:31+5:30
वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मलेशियात उघडकीस आली आहे.
क्वालालंपूर, दि. 10 - वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मलेशियात उघडकीस आली आहे. मलेशियातल्या एका बापानं मुलीवर 600 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, बाप दोषी आढळल्यास त्याला 12 हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 36 वर्षांच्या या घटस्फोटीत आरोपीच्या विरोधातील 626 आरोपांची शहानिशा करण्यासाठी कोर्टाला दोन दिवस लागले आहेत.
स्वतःच्या 15 वर्षांच्या मुलीवर बापाकडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या 599 आरोपांवर कोर्टानं जवळपास शिक्कामोर्तब केलं असून, त्यात कौटुंबिक व्याज, बलात्कार आणि इतर लैंगिक गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र त्याला अद्यापही कोर्टानं दोषी करार दिला नाही. न्यायालय या प्रकरणाचा आणखी अभ्यास करत आहे. जर आरोपी दोषी आढळल्यास त्याला 12 हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असंही सरकारी वकील ईमी सय्याझवानी यांनी सांगितलं आहे.
लैंगिक गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसारही त्याला शिक्षा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्रत्येक आरोपाखाली त्या व्यक्तीला जवळपास 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. बलात्काराच्या आरोपात त्याला 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच लैंगिक शोषणाच्या 30 आरोपांखाली त्याला प्रत्येकी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी आरोपीला पळून जाईल या भीतीपायी सद्यस्थितीत तुरुंगवासात ठेवलं आहे. मुलीच्या आईनं 26 जुलै रोजी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान पत्नी घटस्फोट देऊन निघून गेल्यानंतर त्या नराधम बापानं स्वतःच्या मुलीवर अमानुष अत्याचार केला आहे.