मित्र छोटा, पण दणका मोठा; पदड्याआडून हालचाली घडवत भारताचा पाकिस्तानला दे धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:42 PM2021-06-08T15:42:04+5:302021-06-08T15:44:22+5:30
छोट्या देशाला मोठी मदत करत भारताला पाकिस्तानला दणका
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतानंपाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. मालदिवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या (यूएनजीए) अध्यक्षपदी निवडून आले आहेत. शाहिद संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे ७६ वे अध्यक्ष असतील. मालदिवसमोर अफगाणिस्तानचं आव्हान होतं. मात्र १४३ विरुद्ध ४८ मतांनी मालदिवचा विजय झाला. शाहिद यांचा विजय पाकिस्तानसाठी जोरदार धक्का मानला जात आहे.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेचं अध्यक्षपद सध्या वोल्कन बोज्किर यांच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच वोल्कन यांनी काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. यानंतर भारताकडून वोल्कन यांच्यावर टीका झाली. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा सल्ला वोल्कन यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यावरून भारतानं वोल्कन यांच्यावर तोफ डागली होती. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अध्यक्षांनी अशी भूमिका घेणं योग्य नाही आणि ते त्यांच्या पदाला शोभणारंदेखील नाही, असे खडे बोल भारताकडून सुनावण्यात आले होते.
आता अब्दुल्ला शाहिद संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे अध्यक्ष असतील. ते वोल्कन यांची जागा घेतील. यामुळे भारताला दिलासा मिळाला आहे. तर पाकिस्तानला झटका बसला आहे. शाहिद यांची निवड होताच भारत सरकारकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. मालदिवनं वर्षभरापूर्वी महासभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला. तेव्हापासून भारतानं मालदिवला प्रचारात मोलाची मदत केली. त्यामुळे मालदिवच्या विजयात भारताचा अप्रत्यक्ष हात आहे.
भारत आणि मालदिवचे संबंध अतिशय उत्तम आहेत. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रात भारतानं मालदिवला मदत केली. यानंतर आता मालदिव संयुक्त राष्ट्रातील भारताचे उपस्थायी प्रतिनिधी नागराज नायडू यांना शाहिद यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे. त्यासाठी मालदिव भारताशी चर्चा करत असल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.