मालदीव सरकारची समुद्राच्या खोल पाण्यात कॅबिनेट बैठक; नेमकं कारण काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 02:27 PM2024-01-08T14:27:12+5:302024-01-08T14:28:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मंत्र्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मालदीव चर्चेत आले आहे.
India vs Maldives: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच लक्षद्वीपचा दौरा केला आणि देशातील लोकांनाही तिथे जाण्याचे आवाहन केले. त्यांचे लक्षद्वीपचे फोटो पाहून मालदीवचे मंत्री इतके भडकले की, त्यांनी पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यही केले. याचा परिणाम म्हणून #BoycottMaldives भारतात ट्रेंड होऊ लागला. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला मालदीवमध्ये घडलेल्या एका अनोख्या घटनेबद्दल सांगणार आहोत.
30 मिनिटे चालली बैठक
ही घटना ऑक्टोबर 2009 ची आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे मालदीवसारख्या देशांना अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. मालदीवचा बहुतांश भाग समुद्रसपाटीपासून फक्त एक मीटर उंच आहे. 2100 सालापर्यंत हा देश समुद्रात बुडू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. धोका इतका मोठा आहे की, दरवर्षी देशाचा काही भाग समुद्राच्या पाण्यात मिसळतोय. उच्च तापमानाच्या संकटाबाबतीत जगाला सावध करण्यासाठी तिथल्या सरकारने 19 ऑक्टोबर 2009 रोजी चक्क समुद्रात मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. मालदीवचे सरकार 30 मिनिटे पाण्याखाली होते.
2. In 2009, Maldivian President Mohamed Nasheed held the world's first ever underwater cabinet meeting as a gesture for help over rising sea levels.
— Divine Science🔱 (@divinesciencesX) January 7, 2024
11 ministers signed this document and their wetsuits were auctioned to raise money for coral reef protection. pic.twitter.com/Ew9jpDBCLa
सर्व कॅबिनेट समुद्राच्या पाण्यात
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत 11 मंत्री आणि कॅबिनेट सचिवांनीही भाग घेतला होता. ही बैठक 15 फूट पाण्याखाली झाली, त्यासाठी सर्व मंत्री ऑक्सीजन मास्क लावून समुद्राच्या पाण्यात उतरले. प्रत्येकाने एका दस्तऐवजावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये जगातील सर्व देशांना धोकादायक वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये सर्व नेते काळे डायव्हिंग सूट आणि मास्क घातलेले दिसत होते.
जगातील पहिलीच घटना
अध्यक्ष आणि मंत्र्यांना बसण्यासाठी पाण्याखाली टेबल लावण्यात आले होते. राष्ट्रपतींसह सर्वच मंत्री पाण्याखाली हाताच्या इशाऱ्यांनी बोलले आणि वॉटरप्रूफ बोर्डवर अमिट शाईने टिप्पण्या लिहिल्या गेल्या. यावेळी सर्व मंत्र्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रत्येक मंत्र्यासोबत एक कुशल पाणबुड्या(स्कुबा डायव्हर) पाठवला होता. मालदीवमधील शार्कदेखील फार आक्रमक नाहीत, त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची भीती नव्हती. समुद्राच्या पाण्यात मंत्रिमंडळाची बैठक झाल्याची ही जगातील पहिलीच घटना होती.