मालदीव भारतासोबत दगाबाजी करण्याच्या तयारीत, ड्रॅगनसोबत मिळून रचतोय अशी चाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:09 AM2024-01-24T00:09:55+5:302024-01-24T00:10:20+5:30
Maldives : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू हे पूर्णपणे चीनच्या काह्यात गेल्याची चिन्हे दिसत आहेत. आता ते केवळ चीनच्याच इशाऱ्यावर काम करत आहेत. भारतासोबत सुरू असलेल्या वादादरम्यान, मालदीवने आणखी एक चाल खेळली आहे.
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू हे पूर्णपणे चीनच्या काह्यात गेल्याची चिन्हे दिसत आहेत. आता ते केवळ चीनच्याच इशाऱ्यावर काम करत आहेत. भारतासोबत सुरू असलेल्या वादादरम्यान, मालदीवने आणखी एक चाल खेळली आहे. चीनच्या ज्या हेरगिरी करणाऱ्या जहाजाला श्रीलंकेने आपल्या देशात येण्यापासून रोखले होते. आता त्याच जहाजाला मालदीवने आपल्या देशात बोलावणे धाडले आहे. आता या जहाजाच्या माध्यमातून चीन हिंदी महासागरामध्ये भारताविरोधात हेरगिरी करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार मालदीवने भारतासोबत समुद्री सर्वेक्षणाच्या कराराला संपुष्टात आणल्यानंतर आता मालदीवने चीनशी हातमिळवणी केली आहे. आता आता मालदीव आणि चीन मिळून हिंदी महासागरामध्ये सर्व्हेक्षण करणार आहेत. त्यासाठी चिनी सैन्याचं हेरगिरी जहाज शियांग यांग होंग ०३ हे ३० जानेवारी रोजी मालदीवची राजधानी माले येथे पोहोचणार आहे.
हे जहाज फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील मालदीवची राजधानी माले येथे पोहोचण्याची शक्यता आहे. चीनी हेरगिरी जहाजांच्या हिंदी महासागरातील उपस्थितबाबत भारतासह अनेक देशांनी आक्षेप घेतला आहे. खरंतर या चिनी हेरगिरी जहाजाला पूर्वी श्रीलंकेत यायचं होतं. तेथे हे जहाज खोल समुद्रात सर्व्हे करणार होतं. मात्र भारत आणि अमेरिकेने घेतलेल्या आक्षेपानंतर श्रीलंकेने मागच्या महिन्यात एक वर्षासाठी कुठल्याही परदेशी जहाजाला आपल्या सीमेत येण्यास मनाई केली आहे.
त्यानंतर चीनी जहाज आहा मालदीवमधून हा सर्व्हे सुरू करणार आहे. मालदीवमध्ये काही दिवसांपूर्वी मोहम्मद मोईज्जू यांचं सरकार आलं आहे. मोइज्जू यांनी भारताविरोधात भूमिका घेऊन निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे सत्तेवर येताच त्यांनी भारताविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यासाठी त्यांनी चीनशी जवळीक साधली आहे.