मालदीवच्या मंत्र्याची PM मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी; वाद वाढल्यानंतर मालदीव सरकारने झापलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 03:50 PM2024-01-07T15:50:08+5:302024-01-07T15:51:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या महिला मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली.
Maldives vs India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीपचा दौरा केला. यानंतर सोशल मीडियावर मालदीवमधून भारताविरोधात वक्तव्ये येत आहेत. दरम्यान, मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनीदेखील X वर एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरले. काही वेळानंतर पोस्ट डिलीट केली. आता हाच मुद्दा भारताने मालदीव सरकारसमोर उपस्थित केला आहे.
Indian celebrities, including Akshay Kumar, John Abraham and Sachin Tendulkar, appeal to people to explore Indian islands like Lakshwadeep and Sindhudurg.
— ANI (@ANI) January 7, 2024
Akshay Kumar tweets, "Came across comments from prominent public figures from Maldives passing hateful and racist comments… pic.twitter.com/yRgEwQwcVo
मालदीवच्या महिला मंत्र्याने पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. उच्चायुक्तांनी हा मुद्दा मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर उपस्थित केला असून, मालदीव सरकारनेदेखील आपल्या मंत्र्याच्या टिप्पणीवर एक निवेदन जारी केले आहे. 'हे त्या मंत्र्याचे वैयक्तिक मत आहे. मालदीव सरकारचा त्या मताशी काही संबंध नाही,' असे निवेदनात म्हटले आहे.
मालदीव सरकारचे निवेदन
या प्रकरणाबाबत एक निवेदन जारी करताना मालदीव सरकारने की, 'मालदीव सरकारला सोशल मीडियावरील या अपमानास्पद टिप्पण्यांची जाणीव आहे. ही मते त्यांची वैयक्तिक आहेत असून, मालदीव सरकार त्याचे समर्थन करत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. मालदीव आणि इतर देशातील संबंधांना बाधा येणार नाही, अशा पद्धतीने मत व्यक्त केले पाहिजे. अशी अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास शासनाचे संबंधित अधिकारी मागेपुढे पाहणार नाहीत,' असे या निवेदनात म्हटले आहे.
मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी केली टीका
मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका करणाऱ्या मंत्र्याचा निषेध केला. यासोबतच त्यांनी आपल्याच देशातील नेत्यांनाही सल्ला दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंत्री मरियम शिउना यांनी वापरलेली भाषा 'अभद्र' असल्याची टीका नशीद यांनी केली. तसेच, मालदीवच्या सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी भारत हा 'मुख्य सहयोगी' असल्याचे ते म्हणाले.
नेमका काय वाद आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली होती आणि भारतीयांना या बेटाला भेट देण्याचे आवाहन केले होते. यानंतर मालदीवच्या युवा सक्षमीकरण उपमंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. भारतीय नेटीझन्सकडून टीका झाल्यानंतर मरियम शिउना यांनी पोस्ट हटवली. भारतात सोशल मीडियावर ‘#BoycottMaldives’ ट्रेंड होत आहे.