युनोतून मलिहा लोधींची पाकने केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:31 AM2019-10-02T04:31:26+5:302019-10-02T04:31:44+5:30
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांना दूर करून त्यांच्या जागी मुनीर अक्रम यांची नियुक्ती केली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांना दूर करून त्यांच्या जागी मुनीर अक्रम यांची नियुक्ती केली आहे. मुनीर अक्रम हे २००२ ते २००८ या कालावधीत संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी होते.
संयुक्त राष्ट्रांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा विषय उपस्थित केला होता. ते तेथून मायदेशी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा महत्त्वाचा खांदेपालट झाला. राजदूत मुनीर अक्रम यांची न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी म्हणून डॉ. मलिहा लोधी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. लोधी यांना पदावरून का दूर करण्यात आले याचे कारण दिले गेलेले नाही.
मोदी म्हणाले होते, ‘भारत हा जगाला युद्ध नव्हे तर बुद्धाचा शांततेचा संदेश दिलेला देश आहे.’ भारताने अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान काश्मीरच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहे. (वृत्तसंस्था)
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण चर्चेत भाषणासाठी जास्तीत जास्त १५ मिनिटे दिली जातात तरीही इम्रान खान यांनी ५० मिनिटे भाषण केले व त्यात निम्मा वेळ काश्मीरच्या प्रश्नावर भर होता. खान इशारा देताना म्हणाले होते की, अण्वस्त्रधारी हे दोन देश एकमेकांसमोर आले तर त्याचे परिणाम त्यांच्या सीमांच्या बाहेर दिसतील. याच व्यासपीठावरून काही मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण मात्र शांततेचा संदेश देणारे होते.