मार्लन जेम्स यांना मॅन बुकर
By Admin | Published: October 14, 2015 11:40 PM2015-10-14T23:40:51+5:302015-10-14T23:40:51+5:30
साहित्यातील अत्यंत मानाचा व महत्त्वाचा समजला जाणारा मॅन बुकर पुरस्कार मिळवून जमैकन लेखक मार्लन जेम्स यांनी नवा इतिहास रचला आहे
जमैका : साहित्यातील अत्यंत मानाचा व महत्त्वाचा समजला जाणारा मॅन बुकर पुरस्कार मिळवून जमैकन लेखक मार्लन जेम्स यांनी नवा इतिहास रचला आहे. ‘अ ब्रिफ हिस्टरी आॅफ सेव्हन किलिंग्ज’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मॅन बुकरच्या ४७ वर्षांच्या इतिहासात पुरस्कार मिळविणारे ते पहिले जमैकन लेखक ठरले आहेत. जमैकाचा इतिहास आणि तेथील राजकीय अस्थिरतेवर विविध कथनांतून भाष्य करणारी ‘अ ब्रिफ हिस्टरी आॅफ सेव्हन किलिंग्ज’ ही कादंबरी २०१४ साली प्रसिद्ध झाली होती. याच कादंबरीस ‘ओसीएम बोकास प्राईज आॅफ कॅरेबियन लिटरेचर’ हा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. मार्लन यांची २००९ साली प्रसिद्ध झालेली ‘द बुक आॅफ नाईट वूमेन’ या १९ व्या शतकातील जमैकन मळ्यांमधील गुलाम स्त्रीच्या बंडावरील कादंबरीही विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी २०१० साली ‘जॉन क्रोज डेव्हिल’ ही कादंबरी लिहिली. त्यासही विशेष पुरस्कार मिळाले होते.
मार्लन जेम्सविषयी...
मार्लन जेम्स हे मॅक्लेस्टर महाविद्यालयात इंग्रजी अध्यापनाचे काम करतात. त्यांना यापूर्वी नॅशनल बुक आॅफ क्रिटिक सर्कल अवॉर्ड, डेटन लिटररी प्राईज, मिनिसोटा बुक अवॉर्ड, सिल्व्हर मुसग्रेव्ह मेडल, अॅनिस्फिल्ड वूल्फ बुक अवॉर्ड हे पुरस्कार मिळालेले आहेत.