डब्याऐवजी रोबोटनं ‘बॉस’लाच उचलून फेकलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 09:04 AM2023-11-11T09:04:46+5:302023-11-11T13:33:31+5:30
या तंत्रज्ञानाचा उपयोग खूप मोठा असला तरीही त्याचे काही तोटे आणि धोकेही आहेत.
राबोट्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्या साहाय्यानं अनेक गोष्टी आता खूप सोप्या झाल्या आहेत. ज्या गोष्टींचा पूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो, त्या गोष्टी या नव्या तंत्रज्ञानामुळे आता सहजसाध्य झाल्या आहेत. रोबोट्सचा उपयोग तर अगदी माणसाप्रमाणे, पण मानवी क्षमतेच्या किती तरी पट अधिक आणि किती तरी अचूकतेने करता येऊ शकतो. अनेक कारखाने, धोक्याच्या ठिकाणी काम करण्याच्या जागा, जिथे मानवी क्षमता अपुऱ्या पडतात तिथे, ज्या ठिकाणी अतिशय कौशल्याची गरज आहे आणि अगदी छोटीशी चूकही जिथे अत्यंत महाग पडू शकते.. यासारख्या अनेक ठिकाणी आजकाल रोबोट्सचा वापर केला जातो. वैद्यकीय क्षेत्रात तर रोबोट्स अक्षरश: देवदूत बनूनच मानवाच्या मदतीला आले आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचे असे अनेक उपयोग आपल्याला आता माहीत झाले असले आणि आपल्या ते सवयीचेही झाले असले तरी या तंत्रज्ञानाचा किती मर्यादेपर्यंत उपयोग करायचा, यावरही एक खूप मोठे प्रश्नचिन्ह आज मानवासमोर आहे.
या तंत्रज्ञानाचा उपयोग खूप मोठा असला तरीही त्याचे काही तोटे आणि धोकेही आहेत. ते नजरेआड करून चालणार नाही. या तंत्रज्ञानामुळे मानवी बुद्धिमत्तेची क्षमता कमी कमी होत जाणार का, एक दिवस ही क्षमता अगदी संपूनच जाणार की काय आणि अशीही शंका व्यक्त केली जात आहे. सध्या जगभरात त्यावरून चर्चा सुरू आहे. त्याहूनही मोठी भीती म्हणजे हे तंत्रज्ञान खरोखरच सुरक्षित आहे का? ज्या तंत्रज्ञानाच्या आधारावर पुढल्या भविष्याचं सगळं प्लॅनिंग आखलं जात आहे, तेच तंत्रज्ञान मानवाच्या मुळावरच उठणार का, हा प्रश्न आता गांभीर्यानं विचारला जाऊ लागला आहे. कारण त्याचे धोके आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हे आधुनिक तंत्रज्ञान मानवा-मानवात आणि मानव, तसेच तंत्रज्ञान यांच्यातील भावनिक संबंधांतील गुंतागुंत तर वाढवू लागले आहेतच, पण या तंत्रज्ञानाील छोटीशी चूक लोकांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरू लागली आहे.
मानवी क्षमतेच्या मर्यादा लक्षात घेता कोणतीही क्षुल्लक चूकही राहू नये यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला; पण याच तंत्रज्ञानामुळे थेट लोकांना आपल्या प्राणालाच मुकावं लागणार असेल तर अशा तंत्रज्ञानाचा काय उपयोग, असा प्रश्नही आता जगभरातून विचारला जाऊ लागला आहे.
त्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे दक्षिण कोरियात नुकतीच घडलेली एक घटना. रोबोट्स, रोबोटिक आर्मस्च्या मदतीनं आजकाल अनेक कामं करवून घेतली जातात. त्यामुळे ती पटापट तर होतातच, पण त्यातली अचूकताही अगदी दृष्ट लागावी अशी मानली जाते. दक्षिण कोरियातील एका कंपनीत काही दिवसांपूर्वी रोबोटिक आर्मच्या मदतीनं असंच नेहेमीप्रमाणे एक काम करवून घेतलं जात होतं. खाली ठेवलेले मोठमोठे डबे रोबोटिक आर्मच्या मदतीनं उचलायचे आणि ते पॅनलवर ठेवायचे! अगदी सुरळीत, शिस्तीत आणि यांत्रिकपणे काम सुरू होतं. अचानक त्या रोबाटिक आर्मनं खाली ठेवलेला डबा उचलण्याऐवजी तिथे उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला, आपल्या ‘बॉस’लाच उचललं आणि वर उंचावर पॅनलवर ठेवून तिथून खाली ढकललं. या घटनेमुळे तो कर्मचारी गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याचे प्राण वाचू शकले नाहीत!
ही दुर्घटना त्यावेळी झाली, जेव्हा हा कर्मचारी त्या रोबोटिक आर्मचे सेन्सर ऑपरेशन्स चेक करीत होता. या रोबोटची टेस्टिंग सुरू होती.
खरं तर ही टेस्टिंग ६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार होती, पण त्याच्या सेंसरमध्ये थोडासा बिघाड झाल्याने ही दुरुस्ती थोडी पुढे ढकलण्यात आली होती; पण हा बिघाड नेमका कुठे झाला, हे त्यावेळी स्पष्टपणे कळू शकलं नव्हतं. ज्यावेळी कळलं, तोपर्यंत या रोबोटिक आर्मनं त्या कर्मचाऱ्याचा जीव घेतलेला होता. कंपनीच्या साइटवरील सेफ्टी मॅनेजर्सकडून कोणता हलगर्जीपणा झाला, याची चौकशी आता पोलिस करीत आहेत. दोषी अधिकाऱ्यांना शिक्षाही होईल, पण त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचा जीव काही परत येणार नाही. ‘तंत्रज्ञान हे शाप की वरदान’ हा सनातन प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा आता जगाच्या नकाशावर झळकू लागला आहे.
रोबोटनं चेस खेळाडूचं बोटच तोडलं!
मागच्या वर्षी घडलेली एक घटनाही अशीच खतरनाक समजली जाते. रशियात मॉस्कोमध्ये एक बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती. क्रिस्तोफर हा तिथला एक खेळाडू नऊ वर्षांच्या आतील बुद्धिबळ खेळाडूंमध्ये अतिशय बलवान मानला जातो. रोबोटबरोबर त्याची स्पर्धा सुरू होती; पण चुकून रोबोटच्या आधी तो एक चाल खेळायला गेला, तर त्या रोबोटनं त्याचं बोटच तोडून टाकलं! या घटनेचा व्हिडीओही पाहायला मिळू शकतो!