मानवनिर्मित वस्तूंचे वजन उच्चांकावर; संशोधकांचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 02:22 AM2020-12-14T02:22:34+5:302020-12-14T07:03:00+5:30
सिमेंट, काँक्रिट, प्लास्टिक, धातू, अस्फाल्ट अशा विविध वस्तूंची पृथ्वीवर एवढ्या भरमसाठ प्रमाणात निर्मिती झाली आहे की, यंदाच्या वर्षअखेरीस सर्वाधिक वजन या वस्तूंचेच असेल, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
लंडन : या भूतलावर सर्वाधिक वजनदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला, तर त्याचे उत्तर हत्ती, जिराफ, देवमासा किंवा तत्सम प्राणी असे न देता, सरळसरळ ‘मानवनिर्मित वस्तू’ असे देता येऊ शकणार आहे. तब्बल १.१ टेराटन एवढे वजन या मानवनिर्मित वस्तूंचे आहे!
सिमेंट, काँक्रिट, प्लास्टिक, धातू, अस्फाल्ट अशा विविध वस्तूंची पृथ्वीवर एवढ्या भरमसाठ प्रमाणात निर्मिती झाली आहे की, यंदाच्या वर्षअखेरीस सर्वाधिक वजन या वस्तूंचेच असेल, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. इस्रायलमधील वाइझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतील रॉन मिलो आणि त्यांचे सहकारी हे सर्वजण भूतलावरील जैविक वस्तू आणि मानवनिर्मित वस्तू यांची मोजणी करत आहेत. त्यांनी फक्त जमिनीवरील वस्तूंचे वजन मोजले आहे. पाण्यावरील वा पाण्याखालील वस्तूंचे वजन या पथकाने गृहीत धरलेले नाही. साधारणत: १९०० सालापासूनचा डेटा या पथकाने संकलित केला आहे. त्यावरून काढलेल्या निष्कर्षानुसार यंदाच्या वर्षअखेरपर्यंत वर उल्लेखलेल्या मानवनिर्मित वस्तूंचे वजन जैविक कचऱ्याच्या तुलनेत अधिक भरेल, असे आढळून आले.
आकडेवारी काय सांगते...
२० व्या शतकाच्या सुरुवातीला मानवनिर्मित वस्तूंचे वजन जागतिक जैविक कचऱ्याच्या तुलनेत ३ टक्के होते; परंतु २०२० मध्ये मानवनिर्मित वस्तूंचे वजन जागतिक जैविक कचऱ्याच्या तुलनेत १.१ टेराटनने अधिक भरल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले.