१ हजारचे बिल झाले, दोन लाख टीप म्हणून दिले; आता परत मागतोय...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 10:57 PM2022-09-19T22:57:49+5:302022-09-19T22:58:26+5:30
एक हजार रुपयांचे खाद्य पदार्थ खाऊन दोन लाखांची टीप देणाऱा व्यक्ती पुन्हा आला आहे. ही टीप त्याने महिला वेटरला दिली होती. तसेच जगभरात प्रसिद्धी मिळविली होती.
काही महिन्यांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये एक हजार रुपयांचे खाद्य पदार्थ खाऊन दोन लाखांची टीप देणाऱा व्यक्ती पुन्हा आला आहे. ही टीप त्याने महिला वेटरला दिली होती. तसेच जगभरात प्रसिद्धी मिळविली होती. या महाभागाने आता टीप दिलेले पैसे परत मागितले आहेत. यामुळे टीप स्वीकारलेली महिला वेटर पुन्हा एकदा धक्क्यात आहे.
या ग्राहकाचे मन परिवर्तन झाले आहे. त्याने यासाठी रेस्टॉरंटकडून पैसे परत मागितले असून यासाठी चार्ज बॅक क्लेमदेखील दाखल केला आहे. एरिक स्मिथ नावाच्या या ग्राहकाने तेव्हा ऑनलाईन सुरु असलेल्या टिप्स फॉ़र जीझस या मोहिमेवरून प्रभावित होऊन एवढी भरमसाठ टीप दिल्याचे म्हटले होते. द मिररनुसार अमेरिकेच्या पेंसिल्वेनियातील अल्फ्रेडो कॅफेमध्ये स्मिथ गेला होता. तीन महिन्यांपूर्वी त्याने महिला वेटर मॅरियानाला दोन लाख रुपये टीप म्हणून दिले होते. तिलाही एवढी मोठी रक्कम पाहून धक्का बसला होता.
आता तो परत पैसे मागू लागला आहे. गेल्या महिन्यात, स्मिथने रेस्टॉरंटला पत्र पाठवून सांगितले की त्याला टीपचे पैसे परत हवे आहेत. त्याने क्रेडिट कार्डच्या चार्ज बॅक नियमांनुसार परताव्याचा दावा दाखल केला. यानंतर, रेस्टॉरंटने फेसबुकवर स्मिथशी बोलून त्याबद्दल निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. रेस्टॉरंटने अलीकडेच या प्रकरणी स्मिथला प्रतिसाद देणे बंद केले. त्याचबरोबर स्मिथवरही खटला दाखल करण्यात आला आहे. आता याचा निर्णय न्यायालयातच होणार आहे.
या प्रकरणी रेस्टॉरंटचे मॅनेजर जॅकरी जेकबसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला वाटले की कोणीतरी खरोखर चांगले काम करायचे आहे म्हणून ही टीप देत आहे, परंतु आता या व्यक्तीने तीन महिन्यांनंतर हे कृत्य केले आहे, असे ते म्हणाले.