'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा....
By अमित इंगोले | Published: September 28, 2020 01:33 PM2020-09-28T13:33:26+5:302020-09-28T13:39:43+5:30
हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं.
(Image Credit : Google)
मृत्यू होणार हे सर्वांनाच माहिती असतं. मात्र, त्यानंतर आपलं काय होतं याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातात. जगात सर्वात जास्त मृत्यू कशामुळे होतात? मृत्यूनंतर काय होतं? मानवाची आत्मा कुठे जाते? दुसरं विश्व असतं का? या प्रश्नांची अनेकांना उत्तरे हवी असतात. याबाबत अनेक मुद्दे मांडले जातात. पण ते पूर्णपणे सिद्ध होऊ शकलेले नाहीत. आता तर मृत्यूच्या दारातून परतलेल्या एका व्यक्तीने अजब दावा केलाय. हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं.
ibtimes.co.in ने दिलेल्या वृत्तानुसार, हजीमने NDERF म्हणजेच Near-Death Experience Research Foundation च्या वेबसाइटला त्याचा अनुभव सांगितला. या वेबसाइटवरील त्याचा अनुभव अरबी भाषेत आहे. तो अभ्यासक अहमद हस्सा यांनी इंग्रजीत अनुवादीत केला. ज्यात हजीमने दावा केलाय की, तो एका वेगळ्याच विश्वात जाऊन पोहोचला होता. अशाप्रकारचं विश्व त्याने कधीही पाहिलं नसल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, 'मी अचानक एका वेगळ्या लौकिक विश्वात गेल्याचं मला जाणवलं. गुलाबी ढगं असलेल्या एका मोकळ्या ठिकाणी मी होतो. तिथे मेटलचे अनेक बॉक्स गोल फिरत असल्याचं पाहिलं. तसेच तिथे दोन आवाज ऐकू येत होते जे आध्यात्मिक गोष्टी सांगत होते. त्यातील एकाने एका दुसऱ्या व्यक्तीला सांगितले की, 'याची स्मृती नष्ट करा आणि नव्या बॉडीसाठी तयार करा'. त्यानंतर मला एका मेटलच्या गोल बॉक्समध्ये टाकण्यात आलं. हा बॉक्स नंतर गोल फिरू लागला होता. त्यानंतर माझी स्मृती हळूहळू जाऊ लागली होती'.
त्याने पुढे सांगितले की, त्याने कुणाचातरी आवाज ऐकला. ते बोलत होते की, त्याची मानवी विश्वातील वेळ संपली नव्हती. त्यामुळे त्याने परत जाणं गरजेचं आहे आणि त्याला अनेक चांगली कामे करायची आहेत. हजीमने असाही खुलासा केला की, या क्षणांमध्ये त्याने त्याचं शरीर पूर्णपणे सोडलं होतं. तसेच हा अनुभव त्रास देणाराही नव्हता आणि आनंद देणाराही नव्हता. इतकेच नाही तर त्याने दावा केला की, त्याचे विचार इतर वेळेपेक्षा अधिक वेगाने सुरू होते.
दरम्यान, मृत्यूच्या अनुभवाबाबत आयुष्यभर अभ्यास करणारे Sam Parnia यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मृत्यू ही एक प्रक्रिया आहे. तो पांढरा किंवा काळा क्षण नाही. ते म्हणाले की, वेगळ्या विश्वात गेल्यावर मनुष्य बेशुद्ध होतात. त्यांचा मेंदू काम करणं बंद करतो. आणि हेच मनुष्याचं जीवन संपण्याचं लक्षण आहे. Parnia यांच्यानुसार, मृत्यूच्या दारात असताना होणारा भ्रम हा मृत्यूनंतर दुसरं विश्व असल्याचा पुरावा नाही.