सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:12 IST2024-11-14T15:11:36+5:302024-11-14T15:12:00+5:30
Brazil Supreme Court : ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सत्र संपल्यानंतर बुधवारी (दि.१४) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दोन मोठे स्फोट ऐकू आले.

सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ
साओ पाउलो : ब्राझीलमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीबाहेर बॉम्बने स्वतःला उडवले. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.
याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर न्यायाधीश आणि कर्मचारी इमारत रिकामी करून बाहेर आले. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सत्र संपल्यानंतर बुधवारी (दि.१४) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दोन मोठे स्फोट ऐकू आले. स्फोटानंतर सर्व न्यायाधीश आणि कर्मचारी सुरक्षितपणे इमारतीतून बाहेर पडले.
या घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी या घटनेत संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तसेच, या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. दरम्यान, ब्राझीलच्या फेडरल डिस्ट्रिक्टच्या लेफ्टनंट गव्हर्नर सेलिना लिओ यांनी सांगितले की, संशयिताने आधी संसदेच्या पार्किंगमध्ये कारमध्ये स्फोटक यंत्राचा स्फोट केला होता, यात कोणतीही दुखापत झाली नाही.
२० सेकंदांच्या अंतराने झाले स्फोट
ब्राझिलियाच्या थ्री पॉवर्स प्लाझामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर सुमारे २० सेकंदांच्या अंतरावर हे स्फोट झाले, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, संसद आणि राष्ट्रपती पॅलेस यासह ब्राझीलच्या मुख्य सरकारी इमारती आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. स्फोटामागील कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.