मुस्लिम मुलांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी केला मॅन्चेस्टर हल्ला
By admin | Published: May 26, 2017 09:03 AM2017-05-26T09:03:26+5:302017-05-26T09:16:04+5:30
हल्ल्यातील मुख्य संशयित सलमान अबेदीच्या वडिल आणि भावाला पोलिसांनी लिबियातून ताब्यात घेतलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मॅन्चेस्टर, दि. 26 - ब्रिटमधील मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा जगासमोर दहशतवादाचं आव्हान उभं राहिलं आहे. या हल्ल्यातील मुख्य संशयित सलमान अबेदीच्या वडिल आणि भावाला पोलिसांनी लिबियातून ताब्यात घेतलं आहे. गुरुवारी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा जवानांची कारवाई सुरुच होती. दहशतवाद्यांचं जाळं पुर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न सुरक्षा जवान करत आहेत.
आत्मघाती हल्लेखोर सलमानच्या बहिणीने सांगितलं आहे की, "माझ्या भावाला कदाचित मुस्लिम मुलांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता". काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सलमान आपल्या वडिलांसोहत 2011 रोजी लिबियात गेला होता अशी माहिती मिळत आहे. त्याचवेळी ट्रिपोली ब्रिगेडमध्ये सामील होण्याची त्याची इच्छा होता. लिबियामध्ये पुन्हा एकदा हुकूमशाही यावी अशी या संघटनेची इच्छा आहे.
सलमानचे वडिल अशा संघटनांमध्ये सामील होते. वडिलांविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर सलमान आणि त्याच्या वडिलांना देश सोडून पळून जावं लागलं होतं. सलमानच्या बहिणीने सांगितलं आहे की, "कदाचित माझा भाऊ मुस्लिम मुलांच्या मृत्यूचा सूड घेऊ इच्छिच होता, त्यामुळेच त्याने हा हल्ला केला असावा. जगभरातील मुस्लिम मुलांची खराब परिस्थिती त्याने पाहिली आणि सूड घेण्याचं ठरवलं".
"अमेरिका कशाप्रकारे सीरियामधील मुलांवरही बॉम्बफेक करत आहे हे त्याने पाहिलं होतं", असंही तिने सांगितलं आहे. न्यूज एजन्सी एएफपीने अबेदीची बहिण जोमाना अबेदीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या हल्ल्यानंतर आतापर्यंत आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये अबेदीचा भाऊ इस्माईलचाही समावेश आहे.
मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या कॉन्सर्टमधून हजारो बाहेर पडत असताना आत्मघाती हल्ला करण्यात आला. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला होता तर 59 जण जखमी झालेत. या कार्यक्रमासाठी तरुण व किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात आली होती. शो संपल्यावर एरियाना ही स्टेजवरून गेल्यानंतर हा स्फोट झाला.
या स्फोटात ठार झालेल्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव सलमान अबेदी असे होते व तो 22 वर्षांचा होता, असे मॅन्चेस्टर पोलिसांनी मंगळवारी रात्री जाहीर केले. तर दुसरीकडे लीबियामध्ये सलमानचे वडील आणि भावालाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी लंडनमध्ये 7 जुलै 2005 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. मध्य लंडनमध्ये त्यावेळी साखळी स्फोट घडवून आणण्यात आले होते. यात 52 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. सोमवारी झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ब्रिटनमध्ये संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांसहीत सैनिकदेखील तैनात करण्यात आले आहेत.
कोण होता हल्लेखोर ?
मिळालेल्या माहितीनुसार, मॅन्चेस्टरमधील लीबियन कुटुंबात जन्मलेला सलमान आबदी (22 वर्ष) सेलफॉर्ड युनिर्व्हसिटीचा माजी विद्यार्थी होता. मॅन्चेस्टर मेट्रोपॉलिटन युनिर्व्हसिटीसोबत संबंधित असलेल्या हामिद-अल-सैद यांनी सांगितले की, सलमानचे त्याच्या कुटुंबीयांसोहत चांगले संबंध नव्हते. त्याचे कुटुंबीय त्याला योग्य वळणावर आणण्यासाठी प्रयत्न करत राहिले, मात्र त्यांना यश आले नाही.