Manhattan Project : या ठिकाणी झाली होती पहिली अणुचाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 02:58 PM2018-08-06T14:58:50+5:302018-08-06T14:59:07+5:30
आज 6 ऑगस्ट. 73 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. त्यापूर्वी सुमारे 20 दिवस आधी...
आज 6 ऑगस्ट. 73 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. त्यापूर्वी सुमारे 20 दिवस आधी अमेरिकेने जगातील पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली होती. अगदी एखाद्या रहस्यपटाला लाजवेल अशाप्रकारची गोपनीयता पाळून हा स्फोट घडवण्यात आला होता. 16 जुलै 1945 रोजी न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात घेण्यात आलेल्या या अणुबॉम्बच्या स्फोटाची तीव्रता पाहून या बॉम्बच्या निर्मात्यांनाही धक्का बसला होता.
जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग दाटून येत असतानाच्या काळात अमेरिकेने अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी 1939 पासून मेक्सिकोच्या वाळवंटातील एका ठिकाणी हा बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील सर्वात संहारक अस्र असेल आणि तो बनवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांना पत्र लिहून सांगितले होते.
हा बॉम्ब बनवण्यासाठी मॅनहॅटन प्रोजेक्ट नावाने एक प्रकल्प सुरू करण्यात आला. तसेच प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी एखाद्या अतार्किक संशोधनाचा देखावा निर्माण करण्यात आला. येथे सुमारे सव्वा लाख लोक काम करत होते. मात्र कुणाला संशय येऊ नये म्हणून प्रकल्पस्थळी ठरावीक जागेपर्यंत सर्वाना जाता येत असे. मात्र तिथे नेमके काय चालले ते कुणालाच कळत नव्हते. अखेर संपूर्ण तयारीनंतर 16 जुलै रोजी या बॉम्बची चाचणी घेण्यात आली. या बॉम्बच्या स्फोटाचा आवाज सुमारे 100 किमीपर्यंत ऐकू गेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर जपानमधील हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. त्यातून या बॉम्बची विद्ध्वंसक क्षमता जगासमोर आली.