मनीषा बनल्या पाकच्या पहिल्या हिंदू महिला डीएसपी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:28 AM2022-07-30T11:28:23+5:302022-07-30T11:28:51+5:30
महिलांचे संरक्षण आणि लैंगिक समानतेला देणार प्राेत्साहन
कराची : प्रचंड विपरित परिस्थितीवर कठाेर संघर्षाद्वारे मात करून पाकिस्तानात प्रथमच एक हिंदू महिला पाेलीस उपअधीक्षक झाली आहे. मनीषा रूपेता असे त्यांचे नाव आहे. अनेक नातेवाईकांनीच त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महिलांचे संरक्षण आणि लैंगिक समानतेला प्राेत्साहन देणे, हे आता आपल्यापुढे लक्ष्य असल्याचे मनीषा रूपेता यांनी सांगितले.
मनीषा या सिंध प्रांतातील जेकाेबाबाद भागातील रहिवासी आहेत. त्या म्हणतात की, अनेक गुन्ह्यांमध्ये महिलांना लक्ष्य करण्यात येते. पाकिस्तानातील पुरुषप्रधान समाजात महिलांचे सर्वाधिक शाेषण हाेते. या महिलांचे संरक्षण करणार असल्याचे त्या म्हणाल्या. रूपेता यांनी गेल्यावर्षी सिंध लाेकसेवा आयाेगाची परीक्षा उत्तीर्ण केली हाेती. त्या १५२ यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये १६व्या स्थानी हाेत्या. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर त्यांची ल्यारी या परिक्षेत्रात पाेलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. रूपेता यांच्या तीन बहिणी डाॅक्टर आहेत तर लहान भाऊ औषधीशास्त्राचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी उमरकाेट जिल्ह्यातील पुष्पाकुमार यांनीही अशीच परीक्षा उत्तीर्ण करून त्या सिंध प्रांतातील पहिल्या सहायक उपनिरीक्षक झाल्या हाेत्या.
समाजाचा दृष्टिकाेन बदलण्याचा निर्धार
मनीषा रूपेता यांनी सांगितले की, मी व माझ्या बहिणींनी लहानपणापासून पितृसत्ताक व्यवस्था पाहिली आहे.
केवळ शिक्षक किंवा डाॅक्टरच हाेऊ शकतात, असे मुलींना या व्यवस्थेत सांगितले जाते. चांगल्या कुटुंबातील मुलींनी पाेलीस किंवा न्यायालयातील कामांपासून दूर राहावे, हा दृष्टिकाेनही मला बदलायचा आहे.
रूपेता यांच्यासमाेर राहणार आव्हान
ग्लाेबल जेंडर इंडेक्सनुसार काही वर्षांपूर्वी १५३ देशांच्या यादीत पाकिस्तानचे स्थान १५१ वे हाेते. देशातील ७० टक्के महिला आयुष्यात किमान एकदा तरी घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्या आहेत. त्यामुळे रूपेता यांच्यासमाेर माेठे आव्हान राहणार आहे.