चीनची रेल्वेच्या माध्यमातून बिहारपर्यंत पोहोचण्याची मनीषा
By Admin | Published: May 24, 2016 06:37 PM2016-05-24T18:37:10+5:302016-05-24T18:37:10+5:30
नेपाळला रोड आणि रेल्वेच्या माध्यमातून तिबेटशी जोडल्यानंतर आता चीन बिहारपर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा विचार करतं आहे.
ऑनलाइन लोकमत
चीन, दि. 24- नेपाळला रोड आणि रेल्वेच्या माध्यमातून तिबेटशी जोडल्यानंतर आता चीन बिहारपर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा विचार करतं आहे. चीननं नेपाळला आधीच स्वतःच्या अधिपत्याखाली आणलं आहे. आता चीनचा भारत आणि दक्षिण आशियापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून पोहोचण्याचा विचार असल्याची माहिती चीनच्या मीडियानं दिली आहे.
नेपाळमधल्या रसूवागधी या सीमावर्ती भागाला रेल्वेनं जोडण्याचा करार आधीच चीन आणि नेपाळमध्ये झाला आहे. नेपाळच्या सीमेपर्यंत चीन 2020पर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारणार आहे, अशी माहिती ग्लोबल टाइम्सनं दिली आहे. रसूवागधी या सीमेच्या माध्यमातूनच भारतात रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा विचार आहे. रसूवागधीहून बिरगुंजपर्यंत चीन रेल्वे नेणार आहे. बिरगुंजपासून बिहार फक्त 240 किलोमीटरवर आहे. या माध्यमातून चीनला कोलकाताला वेळेची बचत आणि अंतरही कमी कापून पोहोचता येणार आहे. चीनला उद्देश फक्त नेपाळच्या लोकांचा विकास करणं हा नाही.
चीनला पूर्ण दक्षिण आशियामध्ये रेल्वेचं जाळं विस्तारून अधिपत्य स्थापन करायचं आहे. नेपाळची जनता यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार असून, चीनच्या मदतीमुळे नेपाळ आधीच भारतापासून दुरावला आहे. चीनचा नेपाळच्या माध्यमातून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची आता माहिती समोर येते आहे.