मांझीला बहारीनचे पंतप्रधान देणार मदत
By admin | Published: August 30, 2016 04:13 AM2016-08-30T04:13:44+5:302016-08-30T04:13:44+5:30
रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी खांद्यावर १० किलोमीटर वाहून नेणाऱ्या पतीला बहारीन सरकारने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखविली आहे
दुबई : रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी खांद्यावर १० किलोमीटर वाहून नेणाऱ्या पतीला बहारीन सरकारने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखविली आहे. ओडिशातील कलाहांडी जिल्ह्यात दाना मांझी (४२) याच्या पत्नीचे क्षयरोगाने निधन झाले होते. त्याने २४ आॅगस्ट रोजी मृतदेह खांद्यावर वाहून नेला होता.
बहारीनमधील भारतीय दुतावासाने याबाबत आम्हाला बहारीनचे पंतप्रधान प्रिन्स खलिफा बिन सलमान अल खलिफा यांच्या कार्यालयाकडून अधिकृतरित्या अद्याप काहीही मिळालेले नाही, असे म्हटले. मानवी दृष्टिकोनातून ही मदत देण्याची तयारी दाखविली गेली असून ती दिल्लीतील बहारीनच्या दुतावासाच्या माध्यमातून दिली जाईल, असे सूत्रांकडून समजते.
दाना मांझी यांची बातमी वाचून पंतप्रधान अस्वस्थ झाले व त्यांनी काही तरी करायला हवे अशी भावना व्यक्त केल्याचे वृत्त ‘गल्फ डेली न्यूज’ने दिले.