अनेक भारतीय शहरे पाक क्षेपणास्त्र शाहीनच्या टप्प्यात
By admin | Published: December 11, 2015 11:46 PM2015-12-11T23:46:14+5:302015-12-11T23:46:14+5:30
पाकिस्तानने मध्यम पल्ल्याच्या ‘शाहीन- ३’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानने मध्यम पल्ल्याच्या ‘शाहीन- ३’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. २,७५० कि.मी.चा पल्ला असल्यामुळे अनेक भारतीय शहरे त्याच्या टप्प्यात आली आहेत.
या यंत्रप्रणालीचे विविध डिझाईन आणि तांत्रिक मापदंडांची शहानिशा करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली, असे पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सनने म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र पारंपरिक शस्त्रांसह अण्वस्त्रांचाही मारा करू शकते. क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील लक्ष्यावर अचूक मारा केला. चाचणीच्या वेळी व्यूहात्मक योजना विभाग, व्यूहात्मक दलांचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ व व्यूहात्मक संघटनांचे अभियंते उपस्थित होते. व्यूहात्मक योजना विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल मझहर जमील म्हणाले की, या चाचणीसह देशाने प्रतिरोध क्षमतेत सुधारणा घडवून आणण्यात मैलाचा दगड गाठला आहे.