सौदी अरेबियातील नव्या करामुळे अनेक भारतीयांचे कुटुंबीय माघारी
By admin | Published: June 23, 2017 12:21 AM2017-06-23T00:21:09+5:302017-06-23T00:21:09+5:30
सौदी अरेबिया सरकारच्या एका नवीन करामुळे परदेशांतून तिथे रोजगारासाठी गेलेल्यांना नव्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे.
रियाध : सौदी अरेबिया सरकारच्या एका नवीन करामुळे परदेशांतून तिथे रोजगारासाठी गेलेल्यांना नव्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे. अनेक भारतीय सौदी अरेबियामध्ये असून, या करामुळे अनेक भारतीयांच्या कुटुंबीयांना भारतात परतावे लागण्याची चिन्हे आहेत. सौदी अरेबियाने परदेशातून आलेल्या लोकांवर अवलंबून असलेल्यांवर १ जुलैपासून अवलंबित्व कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमामुळे सौदी अरेबियात रोजगार करणाऱ्यांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे दरमहा १०० रियाल म्हणजे १७00 रुपये अवलंबित्व कर द्यावा लागेल. एखादा कर्मचारी तिथे पत्नी व दोन मुलांसह राहत असेल, तर त्याला दरमहा ३00 रियाल म्हणजेच तब्बल ५१00 रुपये कर भरावा लागेल. सौदी अरेबियामध्ये ४१ लाख भारतीय राहतात. त्या देशातील परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. या निर्णयामुळे अनेक भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना भारतामध्ये परत पाठवायला सुरुवातही केली आहे. कराचा हा बोजा मोठा आहे आणि तो भरणे आम्हाला शक्य नाही, त्यामुळे आम्ही कुटुंबांना परत पाठवायचे ठरवले आहे, असे काही भारतीयांनी बोलूनही दाखविले आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न दरमहा पाच हजार रियालहून (८५ हजार रुपये) अधिक आहे, त्यांनाच त्या देशात फॅमिली व्हिसा दिला जातो. एवढे उत्पन्न असणाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार प्रत्येकी १00 रियाल इतका कर देणे भागच आहे. इतकेच नव्हे, तर पुढील चार वर्षांत म्हणजे २0१0 पर्यंत या कराची रक्कम वाढवली जाणार आहे. याचा फटका भारतीयांसह सर्वच परदेशी कामगार, कर्मचाऱ्यांना बसणार आहे.
परराष्ट्र मंत्रालय मात्र अजूनही गप्प
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबिया प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करावी,
अशी येथील भारतीयांची
इच्छा आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने यावर बोलण्यास नकार दिला आहे. शिवाय अन्य देशाने कोणावर आणि किती कर लावावा, हे भारताने सांगणे शक्यही नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील अधिकाधिक व्यक्तींना मायदेशी पाठवणे हाच भारतीयांपुढे पर्याय आहे.