अनेक मोठे तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर; जगातील पाणी होतेय कमी, २ अब्ज लोकांवर संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 09:19 AM2023-05-21T09:19:00+5:302023-05-21T09:19:14+5:30
'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत.
वॉशिंग्टन : जगातील पाण्याचे साठे नष्ट होत असून, निम्म्याहून अधिक मोठे जलाशय कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जगातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येवर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले असून, त्यातून हा इशारा देण्यात आला आहे.
'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत. त्यांच्या मते शास्त्रज्ञांचे लक्ष नद्यांच्या दुरवस्थेकडे आहे. मात्र, तलावांकडे कोणाचे लक्ष नाही. कॅस्पियन सागर आणि अरल सागर यांसारख्या मोठ्या तलावांमधील नैसर्गिक आपत्ती हे एक मोठे संकट आहे, असे संशोधक म्हणतात. (वृत्तसंस्था)
दरवर्षी २२ गिगा टन पाणी घटले
संशोधकांनी १९९२ ते २०२० या कालावधीत पृथ्वीवरील १,९७२ मोठे तलाव आणि जलाशयांचा उपग्रहांतून काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला. या ३० वर्षांमध्ये पाणी- पातळीमध्ये किती फरक दिसला, हे तपासण्यात आले. त्यातून त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. ५३ टक्के तलावांमध्ये दरवर्षी २२ गिगा टन एवढे पाणी कमी झाल्याचे आढळले आहे.
१९७२ तलाव आणि जलाशयांचा अभ्यास करण्यात आला. भरपूर पाऊस असलेल्या ठिकाणीही जलसाठा घटला. मोठे तलाव आणि जलाशयांमध्ये सुमारे ६०३ क्युबिक किलोमीटर एवढे पाणी घटले आहे. जगातील कोरड्या भागांशिवाय दमदार पावसाच्या भागातील तलावांमध्येही जलस्तर कमी झाला आहे. यामुळे संशोधकांनाही धक्का बसला आहे. हवामान बदलामुळे तापमान वाढले आहे. परिणामी बाष्पीभवन वाढले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
लोकसंख्येवर भीषण पाणीटंचाईचे संकट
पाणी कमी होण्यामागे प्रत्येकजण हवामान बदलाचे कारण देत आहे. याशिवाय आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पाण्याचा वाढता वापर. जगाची लोकसंख्या गेल्या तीन दशकांमध्ये प्रचंड वाढली आहे. साहजिकच पाण्याचा वापरही त्या तुलनेत वाढला आहे.