हसीनांचे दोन बडे मंत्री बांगलादेश सोडण्याच्या तयारीत होते, विमानतळावर पकडले; अनेकजण आधीच पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 09:04 AM2024-08-07T09:04:49+5:302024-08-07T09:07:27+5:30
घरे जाळली जात आहेत, मारहाण केली जात आहे. सर्वत्र भयाचे वातावरण आहे. अशातच आता हसीना यांच्या कॅबिनेटमधील नेत्यांची पळापळ सुरु झाली आहे.
बांगलादेशात कधी काय होईल याचा नेम नाहीय. शेख हसीना यांना तेथील अराजकतेमुळे भारतात पळ काढावा लागला आहे. अवाम लीगच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. घरे जाळली जात आहेत, मारहाण केली जात आहे. सर्वत्र भयाचे वातावरण आहे. अशातच आता हसीना यांच्या कॅबिनेटमधील नेत्यांची पळापळ सुरु झाली आहे. हसीना यांच्या मंत्र्याला भारतात पळून येण्याच्या बेतात असताना ढाका विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री हसन महमूद यांना ढाका विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. ढाका ट्रिब्यूननुसार परराष्ट्र मंत्री ढाका देश सोडून बाहेर जाण्याच्या तयारीत होते. त्यांना हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात येणाऱ्या विमानाचे तिकीट काढण्यासाठी ते गेले होते.
महमूद यांनी विमानतळावर जाण्यापूर्वी रस्तेमार्गे भारतात येण्याचा प्रयत्न केला होता. बांगलादेशात सत्तापालट होण्यापूर्वीच शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षातील अनेक प्रमुख नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री देश सोडून गेले आहेत. अवामी लीगचे सरचिटणीस आणि रस्ते वाहतूक मंत्री अब्दुल कादेर रविवारी रात्रीच देशाबाहेर पडले होते. अनिसुल हक हे देखील हसीना यांच्या राजीनाम्यापूर्वीच देश सोडून गेले होते.
महमूद यांच्याबरोबर दूरसंचार मंत्री म्हणून भूमिका बजावणाऱ्या जुनैद अहमद यांनाही पकडून हवाई दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुंतवणूक सल्लागार आणि खासदार सलमान एफ. रहमानही रविवारी रात्री देश सोडून पळून गेले होते. हसीनांचा पुतण्या शेख फजल नूर तपोश हा देखील शनिवारी सिंगापूरच्या विमानात बसून पळून गेला. वादग्रस्त खासदार शमीम उस्मानने तर आठवडाभरापूर्वीच देश सोडला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बद्रुझमान यांनीही बांगलादेश सोडला आहे. आता जे राहिले आहेत त्यांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.