‘जैश’च्या अनेक मदरशांना टाळे

By admin | Published: January 16, 2016 02:27 AM2016-01-16T02:27:04+5:302016-01-16T02:27:04+5:30

पठाणकोट येथील हवाई तळावरील हल्ल्यामागील ‘जैश-ए-मोहंमद’ या दहशतवादी संघटनेचे अनेक मदरसे पाकिस्तानने बंद केले आहेत.

Many madrassas 'jaish' | ‘जैश’च्या अनेक मदरशांना टाळे

‘जैश’च्या अनेक मदरशांना टाळे

Next

लाहोर : पठाणकोट येथील हवाई तळावरील हल्ल्यामागील ‘जैश-ए-मोहंमद’ या दहशतवादी संघटनेचे अनेक मदरसे पाकिस्तानने बंद केले आहेत.
पंतप्रधान नवाज शरीफ यांचा गड मानल्या जाणाऱ्या पंजाब प्रांतात ही कारवाई करण्यात आली. या आधी ‘जैश’चा म्होरक्या मौलाना मसूद अजहरसह अनेक दहशतवाद्यांची धरपकड करण्यात आली होती. ‘जैश’चे मुख्यालयही पंजाब प्रांतात आहे.
पंजाब प्रांताचे कायदामंत्री राणा सनाउल्लाह यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी डस्का भागातील जामियातुल नूर मदरशावर धाड टाकून अनेक लोकांना अटक केली. तसेच मदरशाला टाळे ठोकण्यात आले असून तेथून दस्तावेज आणि पुस्तके जप्त करण्यात आली.
‘जैश’मार्फत चालविण्यात येणारे मदरसे आणि कार्यालयांवर धाडी टाकून ती बंद करण्यात आली आहेत. तसेच अनेकांना अटक करण्यात आली आहे. जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्तास सनाउल्लाह यांनी दुजोरा दिला होता. पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्याशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी गुरुवारी एका टीव्ही चॅनलला सांगितले होते.
पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणारी विदेश सचिव पातळीवरील बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Many madrassas 'jaish'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.