न्यूझीलंडमध्ये मशिदीतल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, बांगलादेशची टीम सुदैवानं थोडक्यात बचावली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 08:41 AM2019-03-15T08:41:31+5:302019-03-15T10:21:45+5:30
न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड सिटीतल्या एका मशिदीमध्ये अज्ञातानं गोळीबार केला आहे.
वेलिंग्टन- न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड सिटीतल्या एका मशिदीमध्ये अज्ञातानं गोळीबार केला आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या गोळीबारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अज्ञातानं केलेल्या या गोळीबारात अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
न्यूझीलंड पोलिसांच्या माहितीनुसार, क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे एक शूटर उपस्थित आहे. पोलीस त्याचा सामना करत आहेत. परंतु या गोळीबारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला, याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. सेंट्रल ख्राइस्टचर्चच्या प्रशासनानं लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, मशिदीत ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते. तर शेजारी असलेल्या दुसऱ्या मशिदीला रिकामी करण्यात आलं आहे.
#BREAKING Armed police in New Zealand swarm central Christchurch amid reports of a shooting at a mosque in the South Island city, as local media report multiple casualties pic.twitter.com/Oc3dMlbDby
— AFP news agency (@AFP) March 15, 2019
बांगलादेशची टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. घटनास्थळी बांगलादेशच्या क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते. बांगलादेशातील क्रिकेट टीमचा खेळाडू तमीम इक्बालनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. गोळीबारात पूर्ण बांगलादेशची टीम थोडक्यात बचावली आहे. हा फारच भीतीदायक अनुभव असल्याचंही तमीम इक्बालनं सांगितलं आहे.
Entire team got saved from active shooters!!! Frightening experience and please keep us in your prayers #christchurchMosqueAttack
— Tamim Iqbal Khan (@TamimOfficial28) March 15, 2019
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी सांगितल की, खेळाडू बसमधून उतरून मशिदीत जाणार, त्याचदरम्यान हा गोळीबार झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला.