मलेशियाच्या उत्सव वर्षाला मराठी मातीचा गंध
By Admin | Published: March 9, 2015 11:31 PM2015-03-09T23:31:16+5:302015-03-09T23:31:16+5:30
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या मलेशियातील इअर आॅफ फेस्टिवलमध्ये वर्षभर होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांत मूळ दक्षिण भारतीय वंशाच्या
धर्मराज हल्लाळे, क्वालालंपूर
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या मलेशियातील इअर आॅफ फेस्टिवलमध्ये वर्षभर होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांत मूळ दक्षिण भारतीय वंशाच्या नागरिकांचा सहभाग लक्षणीय आहे़ त्याचवेळी मलेशियातील लिटल इंडिया अशी ओळख असलेल्या ब्रीक फिल्डस् भागातील ३५० मराठी कुटुंबही आपला बाणा जपत सण-उत्सव साजरे करीत असून गुढीपाडवाही थाटात होईल़
चिनी नववर्ष प्रारंभाचा खुला उत्सव तेलुक इन्तान (पेरा) येथे २८ फेब्रुवारीपासून सुरू झाला़ त्याचवेळी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली मलेशियास्थित मराठी माणसेही आपली भाषा, वेशभूषा, संस्कृती, परंपरा जपत महाराष्ट्रीयन मंडळाच्या माध्यमातून उत्सवांचे २०१५ वर्ष आपापल्या रंगढंगात साजरा करीत आहेत़
मलेशियातील महाराष्ट्रीयन मंडळाचे अध्यक्ष तथा मूळचे नागपूर येथील पंकज हेडाऊ लोकमतशी बोलताना म्हणाले, मलेशियामध्ये भारतीयांचा सन्मानपूर्वक उल्लेख होतो़ अगदी मलेशियाच्या स्वातंत्र्यापासून इथे राहणारी मंडळी आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत़ डॉ़वसंत नाडकर्णी, अजित केळकर, सतीश दळवी, नारायण नायर, अभिजित मुळे यांनी सुरुवातीच्या काळात मंडळाचे काम उभे केले़ त्यानंतर नंदकिशोर सावंत, विवेक परांजपे, संजय दीक्षित, संजय लांडगे, शिवाजी धुरी, मंदा हसमनीस, जिवेंद्र पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी गणेशोत्सव, कोजागिरीसह मराठी सण उत्सव एकत्रितपणे साजरे करण्याची परंपरा सुरू केली़ सण उत्सवाबरोबर मनोरंजन व प्रबोधनाच्या कार्यक्रमांचीही रेलचेल सुरू असते़ दिलीप प्रभावळकर, संदीप पाठक यांनी संवाद साधला़ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्याशीही मराठी कुटुंबांनी बातचीत केली़
दरम्यान, मलेशियातील उत्सव वर्षाचा भाग म्हणून चिनी नववर्ष प्रारंभाचा दिमाखदार सोहळा तेलुक इन्तान येथे नुकताच झाला़ यावेळी भारतासह फिलिपाईन्स, जपान, सिंगापूर, सौदी अरेबिया, इराण, आॅस्ट्रेलिया, रशिया अशा आठ देशांतून आलेल्या ५० पत्रकारांसह हजारो पर्यटकांनी उत्सव वर्षाच्या सोहळ्याला हजेरी लावली़ यावेळी मलेशियाचे उपपंतप्रधान हाजी मोहीयोद्दीन मोहमद यासीन, पेराचे मुख्यमंत्री डॉ़झांबरे अब्दुल कदीर यांची उपस्थिती होती़
मले भाषेवर संस्कृतचा प्रभाव
मलेशियातील प्रमुख मले भाषेवर संस्कृतचा प्रभाव दिसून येतो़ मलेशियन उपपंतप्रधान व मंत्र्यांच्या भाषणातील भाग्यम्, मंत्री, पूत्र, स्त्री, भूमीपूत्र, बहुमान यासह अनेक शब्द संस्कृत, मराठीशी अर्थासह जुळणारे आहेत़ उर्दू, हिंदीचाही उल्लेख होतो़