कॅनडातही जपली जाते मराठमोळी संस्कृती; गुढीपाडवा व चैत्र गौरी हळदी-कुंकू समारंभ दिमाखात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 07:50 AM2022-04-09T07:50:50+5:302022-04-09T07:51:00+5:30
सातासमुद्रापार असलेल्या कॅनडात आपल्या मराठमोळ्या भारतीय महिलांनी संस्कृती जपली आहे. चैत्र गौरी हळदी कुंकू आणि गुढीपाडव्याचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच मिसिसाका, टोराेंटो येथे वैदेही राऊत आणि प्रवीणा काळे यांनी आयोजित केला होता.
टोरोंटो :
सातासमुद्रापार असलेल्या कॅनडात आपल्या मराठमोळ्या भारतीय महिलांनी संस्कृती जपली आहे. चैत्र गौरी हळदी कुंकू आणि गुढीपाडव्याचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच मिसिसाका, टोराेंटो येथे वैदेही राऊत आणि प्रवीणा काळे यांनी आयोजित केला होता.
१९७८ मध्ये भारतीय मराठी भाषिकांची संख्या खूप कमी होती. त्यावेळी येथील मराठी भाषिकांच्या मुलांना आपली संस्कृती समजण्यासाठी या कार्यक्रमांच्या आयोजनाची सुरूवात केली. आमची परंपरा वनिता मंडळातर्फे हा कार्यक्रम गेल्या ४० वर्षांपासून येथे आयोजित केला जातो आणि त्यांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो.
यावेळी सुमारे ३५० महिला उपस्थित होत्या आणि स्वच्छतेच्या अनेक पैलूंची काळजी घेण्यात आली होती . कॅनडात आलेल्या नवीन नागरिकांना भेटण्यासाठी आणि नवीन मित्र जोडण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले अशी माहिती प्रवीणा काळे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कौन्सलेट जनरल ऑफ इंडियाच्या अपूर्वा श्रीवास्तव जनरल कौन्सलेट ऑफ इंडिया होत्या. मुख्य पाहुण्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले आणि आपली संस्कृती परदेशात जपली जाते हे पाहून त्यांना अभिमान वाटला.
सुमारे ५ तास चाललेल्या या कार्यक्रमात हळदी कुंकू आणि वाण म्हणून उपस्थित महिलांना जोडवी दिली. कार्यक्रमात मस्ती, डान्स याचबरोबर खाद्यपदार्थ यांची रेलचेल होती.भिल्ल, लावणी फ्युजन आणि टपोरी गँग असे विविध सांस्कृतिक नृत्य यावेळी भारतीय महिलांनी सादर केले.
गाण्यांद्वारे लता मंगेशकरांना श्रद्धांजली
१. उपस्थित प्रत्येक महिलेने लता मंगेशकर आणि बिरजू महाराज यांना २ मिनिटे मौन धारण करून आणि मोबाईल टॉर्च पेटवून आदरांजली वाहिली.
२. मयुरा कुलकर्णी, चारूशीला कुंभेजकर, क्षितिजा तलफडे, अरुणा कर्णिक, सारिका गावंडे, शाकंबरी मोहरील, भारती लोकरे यांनी सादर केलेल्या नृत्याच्या रूपात लता मंगेशकरांची गाणी सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
३. खरेदीसाठी अनेक छोटे व्यवसायाचे स्टॉल्स येथे उपलब्ध होते. नुकताच व्यवसाय सुरू करणाऱ्यांना येथे चांगले प्रोत्साहन मिळाले अशी माहिती आयोजकांनी दिली.